Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभेसाठी आता चांगलीच रणधुमाळी सुरु झाली आहे. राजकीय आरोप प्रत्यारोप, नाराज लोकांची मोट बांधण्याचे कसब अगदीच जोरावर आले आहे. भाजपकडून खा. सुजय विखे व महाविकास आघाडीकडून निलेश लंके अशी लढत असल्याने आता रंग चांगलाच चढू लागला आहे.
एकीकडे सुजय विखे मित्र, कार्यकर्ते व नाराज असणाऱ्यांची एकत्रित मोट बांधत पुढे चालले आहेत. तर निलेश लंकेची यात मागे नाहीत. त्यांनी महाविकास आघाडीतील मित्र व विखे विरोधकांनाही एकत्रित घेण्याचे कसब सुरु केलेले दिसते.
एकंदरीतच निलेश लंके यांच्या उमेदवारीमुळे शरद पवार गट व महाविकास आघाडीत ख़ुशी आहे. असे असले तरी शरद पवार यांचे नातू आणि आमदार रोहित पवार यांच्या मनात नेमकं काय आहे? राम शिंदे व लंके यांची जवळीकता रोहित पवारांना खटकली आहे का? अशा चर्चा सुरु आहेत.
पुणे येथे झालेल्या पुस्तक प्रकाशनानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार, जयंत पाटील आणि इतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील नेते दिसले. परंतु तेथे रोहित पवार दिसलेच नाहीत. तसेच लंके हे शरद पवार गटात आल्यानंतर जसे इतरांनी स्वागत केले त्यापद्धतीने जोरकसपणे रोहित पवारांनी स्वागत केलेलं पाहायला मिळाले नाही. त्यामुळे रोहित पवार यांच्या मनात नेमकं काय आहे अशी चर्चा रंगली आहे.
या सर्व घडामोडीनंतर निलेश लंके यांनी सुपा येथे कार्यकर्ता मेळावा घेतला. तेथे त्यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचे जाहीर करत तुतारी हाती घेतली. या घडामोडीनंतर कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी शरद पवार गटातील अनेकांनी त्याचे स्वागत केले. त्यानंतर लगेचच निलेश लंके यांची उमेदवारी देखील जाहीर करण्यात आली. परंतु या सगळ्या घडामोडी झाल्या तरीही आ. रोहित पवारांकडून त्यावर म्हणावी तशी प्रतिक्रिया येताना दिसली नाही.
राम शिंदेंशी जवळीकता हे दुराव्याचे कारण ?
मधल्या काळात निलेश लंके आणि कर्जत-जामखेडचे भाजपचे विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांच्यात खूप जवळीकता वाढली व एकमेकांना आधार देण्याची भाषा ते करत होते. त्यामुळे रोहित पवार हे निलेश लंके यांच्यावर नाराज आहेत का? अशी देखील एक चर्चा आहे.
मुद्दामून विष पेरण्याचे काम
या सर्व चर्चा घडवून आणून लोकांच्या मनात विष पेरण्याचे काम काही लोक करतायेत. आ.रोहित पवार हे राष्ट्रवादीचे नेतृत्व असलेल्या शरद पवारांच्या कुटुंबातील व्यक्ती असल्याने त्यांच्यावर केवळ जिल्ह्याची नव्हे तर राज्याची जबाबदारी असल्याचे निलेश लंके यांनी सांगितलेय.