Ahmednagar Politics News : अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सध्या महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार केला जात आहे. येथे यंदा महायुतीचे सुजय विखे पाटील आणि महाविकास आघाडीचे निलेश लंके यांच्यात भिडंत होत आहे. दरम्यान, महायुतीच्या नेत्यांच्या माध्यमातून लोकसभा मतदारसंघात बुध सक्षमीकरण अभियान राबवले जात आहे. या अंतर्गत राशीन येथे बुध सक्षमीकरण अभियान शिबिर घेण्यात आले.
या शिबिरात आमदार राम शिंदे आणि डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यांपूर्वी सुजय विखे यांच्या उमेदवारीला विरोध करत असलेले विधानपरिषद आमदार राम शिंदे यांनी सुजय विखे पाटील यांना निवडून आणण्याचा चंग बांधला आहे.

यामुळे जशी सुजय विखे आणि आमदार राम शिंदे यांच्या विरोधाची चर्चा रंगत होती तशीच आता त्यांच्या जुगलबंदीची देखील चर्चा रंगू लागली आहे. बूथ सक्षमीकरण अभियानात बोलताना विधान परिषद आमदार राम शिंदे यांनी तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार आणि अहिल्यानगरचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटीलच होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ असल्याचे म्हटले आहे.
सुजय विखे यांना निवडून आणण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने मनापासून प्रयत्न करा, असे प्रतिपादन देखील यावेळी शिंदे यांनी केले. यामुळे राशीन येथील या मेळाव्यातले विधान परिषद आमदार राम शिंदे यांचे हे वक्तव्य सध्या नगरच्या राजकीय वर्तुळात विशेष चर्चेस आले आहे.
तसेच पुढे बोलताना शिंदे यांनी ‘विधानसभेला लोक म्हणाले, वेगळा नमुना घेऊन बघू. आता तुम्ही नमुना बघितलाय. तिकडे बऱ्याच जणांचा हिरमोड झाला आहे. विखे तुम्ही काहीही काळजी करू नका जशी-जशी निवडणूक जवळ येईल तशी-तशी आता गर्दी वाढणार आहे.
त्यामुळे तुम्ही प्रचारासाठी दुसरीकडे वेळ द्या कर्जत-जामखेड तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.’ असं म्हणत विद्यमान खासदार पुन्हा एकदा खासदारकी भूषवतील असा विश्वास व्यक्त केला आहे.
सुजय विखे पाटील काय म्हणालेत ?
सुजय विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करतांना यंदा मी पाच लाखांची लीड घेईल असा शब्द देत पुन्हा एकदा विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी राजकारण भाड्याच्या लोकांनी नव्हे तर प्रेमाच्या लोकांनी होतं हिच आपली कमाई आहे.
यावेळी त्यांनी विरोधक आमच्या श्रीमंतीवर टीका करतात मात्र आमच्या समृद्धीचा फायदा सर्वसामान्य जनता विळदघाटात उपचारातून घेत असल्याचे म्हटले आहे.
बाजारातून घेतलेला फुगा घरात ठेवल्यानंतर त्याची हवा निघून जाते, तसेच विरोधी उमेदवार देखील बाजारातील एक फुगाच आहे आणि या फुग्यातील हवा चार दिवसात फुस्स होईल अशी टीका यावेळी सुजय विखे पाटील यांनी केली आहे.