Ahmednagar Politics News : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. या जागेवरून महायुतीकडून भाजपाने आपला उमेदवार मैदानात उतरवला आहे. भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिली आहे. खरेतर भारतीय जनता पक्षाकडून सुजय विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विखे पाटील यांनी आपले राजकीय कसब वापरून पक्षांतर्गत काही नेत्यांची असणारी नाराजी दूर करण्यात यश मिळवले आहे. यामुळे आता भारतीय जनता पक्षाचे आणि महायुती मधील इतर मित्र पक्षांमधील नगरमधील नेते सुजय विखे यांना पुन्हा एकदा विजयी बनवण्यासाठी मैदानात उतरले आहेत.
संपूर्ण नगरभर प्रचार सभा घेतल्या जात आहेत. भारतीय जनता पक्ष, अजित दादा गट आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाला नगर दक्षिण मधून पुन्हा एकदा विखे पाटील हेच विजयी होणार असा विश्वास आहे.या तिन्ही घटक पक्षांमधील कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. या तिन्ही पक्षांच्या नेत्यांची, पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची बॉण्डिंग पाहायला मिळते. याशिवाय सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुजय विखे पाटील यांची यंत्रणा देखील आपल्या कामाला केव्हाच लागली आहे.
‘अबकी बार फिर से सुजय विखे खासदार’ असे म्हणतं कार्यकर्त्यांनी आपले काम केव्हाच सुरू केले आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सुजय विखे पाटील यांच्या विरोधात यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून माजी पारनेरचे आमदार निलेश लंके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. निलेश लंके हे आधी अजितदादा यांच्या गटात होते. मात्र लोकसभा निवडणूक लढवण्याची त्यांची इच्छा असल्याने त्यांनी शरद पवार यांच्या गटात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार त्यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिला. आता ते शरद पवार यांच्या गटात असून यंदाची लोकसभा निवडणूक ते तुतारी या चिन्हावर लढवणार आहेत. त्यांना शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवारी देखील बहाल करण्यात आली आहे. अर्थातच यंदाची नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातली निवडणूक विखे विरुद्ध लंके अशी होणार आहे.
या निवडणुकीत दुसऱ्यांदा विजय मिळावा यासाठी विखे-पिता पुत्रांची स्पेशल यंत्रणा देखील कार्यान्वित झाली आहे. खरंतर विखे घराण्याने या निवडणुकीची तयारी जेव्हा सुजय विखे यांना तिकीट मिळालेले नव्हते तेव्हापासून सुरू केली आहे. यावरून नगरच्या राजकारणातील जाणकार लोकांनी पुन्हा एकदा सुजय विखे यांचे पारडे जड असल्याचे मत व्यक्त केले आहे.
मागे काही प्री पोल देखील आले होते, यामध्ये सुद्धा नगर दक्षिणची जागा भाजप जिंकू शकते असे म्हटले गेले होते. अशातच मात्र नगरमधून एक मोठी अपडेट समोर येत आहे. ती म्हणजे महायुतीमध्ये समाविष्ट असणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू नगर दक्षिणमध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार निलेश लंके यांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे. काल अर्थातच 30 मार्चला त्यांनी याबाबतचे सूचक विधान केले आहे.
काल त्यांनी छत्रपती संभाजी नगर मध्ये आपल्या कार्यकर्त्यांसमवेत बैठक घेतली होती. यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना अहमदनगर या लोकसभा मतदारसंघावर भाष्य केलं आहे. यावेळी बच्चू कडू यांनी प्रत्येक जिल्ह्यातील काही कार्यकर्ते असं सांगत आहे की, आम्हाला भरपूर त्रास झाला आहे. काहीजण सांगत आहेत की, निलेश लंके हे चांगले आहेत. त्यामुळे हा सगळा विचार करून आम्हाला एका निर्णयापर्यंत जावं लागणार आहे.
कडू यांनी महायुतीमध्ये समाविष्ट असतानाही असे विधान केल्यामुळे साहजिकच या विधानाची चर्चा सर्व दूर होणारच होती. मात्र बच्चू कडू यांच्या पक्षाची अहमदनगरमधली ताकद पाहता प्रत्यक्षात कडू यांनी निलेश लंके यांना पाठिंबा दिला तरीही याचा फारसा काही फायदा लंके यांना होणार नसल्याचे सुचित करत आहे. दरम्यान या पक्षातील काही लोक, जिल्ह्यातील कार्यकर्ते विखे घराण्याला विरोध करतात. याचमुळेच बच्चू कडू यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांनी लंके चांगले आहेत, असे म्हटले असावे.
मात्र आता बच्चू कडू यांच्या पक्षातील कार्यकर्ते खरंच लंके यांचा प्रचार करणार का हे पाहण्यासारखे राहील. परंतु बच्चू कडू यांनी निलेश लंके यांना अजूनही पाठिंबा दिलेला नाही. जर कडू यांनी असा निर्णय घेतला तर लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार सुरू झालेला असतानाच महायुतीसाठी हा एक मोठा धक्का राहू शकतो. बच्चू कडू यांची पक्षाची ताकद नगर मध्ये खूपच कमी आहे. यामुळे निलेश लंके यांना बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला तरी याचा महायुतीला नगरमध्ये फारसा धक्का बसणार नाही.
पण अमरावतीमध्ये आधीच महायुतीच्या उमेदवाराविरोधात अर्थातच नवनीत राणा यांच्या विरोधात बच्चू कडू यांनी दंड थोपटले आहेत. यामुळे बच्चू कडू यांनी जर नगरमध्ये निलेश लंके यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला तर भारतीय जनता पक्ष हे खपवून घेणार नाही. साहजिकच त्यांनी असा निर्णय घेतला तर ते महायुती विरोधात काम करत आहेत असे मानले जाईल. दरम्यान बच्चू कडू यांच्या या विधानामुळे आता ते महायुतीमधून बाहेर पडणार का ? असे प्रश्न अन यावरून विविध चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहेत.