Ahmednagar Politics News : अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा मतदारसंघ आणि नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ या दोन जागांकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून युबीटी शिवसेनेचा उमेदवार जाहीर झाला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाने या जागेवरून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना संधी दिली आहे.
महायुतीचा मात्र या जागेवरून अजूनही उमेदवार जाहीर झालेला नाही. परंतु या जागेवर एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून उमेदवार दिला जाईल अशा चर्चा आहेत. दुसरीकडे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून भाजपाने उमेदवार दिला आहे.
या जागेवर बीजेपीने विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांना पुन्हा एकदा संधी देण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे. दुसरीकडे या जागेसाठी अजूनही महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर झालेला नाही.
पण गेल्या अनेक दिवसांपासून या जागेवर महाविकास आघाडीकडून निलेश लंके यांना उमेदवारी दिली जाणार अशा चर्चा आहेत. निलेश लंके हे अजित दादा यांच्या गटात आहेत. ते पारनेरचे आमदार आहेत.
मात्र ते अजित दादा यांची साथ सोडतील, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील आणि हाती तुतारी घेऊन सुजय विखे पाटील यांच्या विरोधात उभे राहतील अशा चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून नगरच्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहेत.
मध्यंतरी मात्र आपली आमदारकी वाचवण्यासाठी निलेश लंके हे स्वतः लोकसभेच्या रिंगणात उतरणार नाहीत तर आपल्या पत्नीला अर्थातच सौ राणी लंके यांना उमेदवारी देतील असे देखील तर्क समोर आले होते. यामुळे या जागेवरून महाविकास आघाडीचा उमेदवार कोण राहणार याबाबत संभ्रमावस्था तयार झाली होती.
अशातच मात्र आता अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचा चेहरा कोण राहणार याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
काय म्हटलेत बाळासाहेब थोरात
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात आमदार नीलेश लंके यांची जोरदार एन्ट्री होईल आणि तेथील निवडणूक देखणी होईल, असे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. त्यांनी आज पत्रकारांशी बोलताना या जागेवरून निलेश लंके यांना महाविकास आघाडीकडून तिकीट मिळणार असे स्पष्ट केले आहे.
यावरून महाविकास आघाडीकडून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी निलेश लंके यांची उमेदवारी जवळपास फिक्स झाली असल्याच्या चर्चा पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत. तसेच पत्रकारांशी बोलताना थोरात यांनी उत्तरेत शिवसेनेचे खासदार निवडून जात असल्याने या जागेवर काँग्रेसने दावा केला नाही, असे म्हटले.
शिवाय त्यांनी वंचित बाबतही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत पक्षश्रेष्ठी देखील चर्चा करीत आहे, त्यांनी महाविकास आघाडीत यावे, अशी आमची अपेक्षा असल्याचे म्हटले आहे.