Ahmednagar Politics News : लोकसभा निवडणुकीचे बिगुल अखेरकार वाजले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या लोकसभा निवडणुकीची आतुरतेने वाट पाहिली जात होती त्या निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगाने नुकत्याच जाहीर केल्या आहेत. यामुळे संपूर्ण देशभरात राजकारण पूर्णपणे तापलेले पाहायला मिळत आहे. राजकीय पक्ष आता आपले अधिकृत उमेदवार जाहीर करत आहेत.
भाजपाने देखील आपले अधिकृत उमेदवार हळूहळू जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी देखील भाजपाने आपल्या उमेदवाराचे नाव जाहीर केले आहे. या जागेवर बीजेपीने पुन्हा एकदा विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांना तिकीट दिले आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडी कडून या जागेवर कोण उभे राहणार याबाबत अजूनही माहिती समोर आलेली नाही. परंतु अजित दादा यांच्या गटातील पारनेरचे आमदार निलेश लंके हे या जागेवरून महाविकास आघाडीचा चेहरा राहतील असा अंदाज आहे.
नगरच्या राजकीय वर्तुळात अशाच चर्चा सध्या पाहायला मिळत आहेत. एकतर निलेश लंके किंवा त्यांच्या धर्मपत्नी अर्थातच राणीताई लंके या जागेवरून सुजय विखे पाटील यांना आव्हान देतील अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. यामुळे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक यंदा चांगलीच काटेदार होण्याची आशा आहे.
दुसरीकडे सुजय विखे यांनी लोकसभेसाठी गेल्या काही दिवसांपूर्वीच तयारी सुरू केली होती. चना डाळ आणि साखर वाटपाच्या माध्यमातून त्यांनी मतपेरणी सुरू केली. सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन त्यांनी जनसंपर्क वाढवण्याचा प्रयत्न केला.
एवढेच काय तर भाजपाने तिकीट जाहीर केल्यानंतर त्यांनी पक्षाच्या पहिल्याच आढावा बैठकीत कार्यकर्त्यांची नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची माफी मागून टाकली. या निमित्ताने त्यांनी विधानपरिषद आमदार राम शिंदे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्यांनी रामभाऊची भेट देखील घेतली.
विखे पिता-पुत्र आणि राम शिंदे यांच्यात बंद दाराआड सविस्तर चर्चा झाली. दरम्यान आता आपण सुजय विखे यांच्यापुढे निलेश लंके यांच्याशिवाय कोणकोणते मुद्दे आव्हानात्मक राहणार आहेत, कोणते मुद्दे निवडणुकीत निर्णायक ठरणार आहेत हे थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पक्षातील आणि महायुतीमधील नेत्यांचा विरोध
विखे यांचा स्वतःच्या पक्षातून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. स्व पक्षातील आमदार राम शिंदे आणि युवा नेते विवेक कोल्हे हे त्यांचा उघड-उघड विरोध करत आहेत. तथापि त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रामभाऊंनी सुजय विखे हे आमचे उमेदवार असतील, त्यांची उमेदवारी मला मान्य आहे, सुजय विखे हेच विजयी होतील असा विश्वास बोलून दाखवला आहे.
परंतु हे बोलण्यापुरतं होतं की रामभाऊ आपल्या कार्यकर्त्यांमध्ये देखील हा विश्वास जागवतात हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे. कारण की गेल्यावेळी सुजय विखे यांचा विक्रमी मताधिक्यांनी विजय झाला, परंतु यामागे आमदार राम शिंदे यांची रणनीती देखील मोठी कामाची ठरली होती. यामुळे आता राम शिंदे तथा महायुती मधील इतर नाराज कार्यकर्ते सुजय विखे यांना प्रामाणिक मदत करणार का हे पाहण्यासारखे राहणार आहे.
मतदार या मुद्द्यावर आहेत नाराज
मराठा आंदोलन तथा सगेसोयरे बाबत कायदा तयार करण्याची मागणी, महागाई, कांदा निर्यात बंदी, दूध उत्पादकांचे अडकलेले अनुदान, इत्यादी मुद्दे या निवडणुकीत सुजय विखे यांच्यासाठी आव्हानात्मक राहणार आहेत.