Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभेची लढत आता रंगात आली आहे. विखेंविरोधात निलेश लंके असा प्रतिष्ठेचा सामना रंगणार आहे. यामध्ये दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोप सुरु झाले असून आता बेरजेचे राजकारण सुरु झाले आहे.
शत्रूचा शत्रू तो आपला मित्र अशी एक म्हण आहे. त्यानुसार आता विखे विरोधकांची एकत्रित मोट बांधण्याचा प्रयत्न निलेश लंके यांनी याआधीच सुरु केला आहे. यात आता खा. सुजय विखे देखील मागे राहिलेले नाहीत.
त्यांनी निलेश लंके यांचे एकेकाळचे जवळचे असणारे व आता कट्टर राजकीय शत्रू बनलेले माजी नगराध्यक्ष विजय औटी यांना आता आपल्या सोबत घेतले आहे. त्यांच्या मदतीने ते एक मोठा राजकीय टाकण्याच्या तयारीत आहेत.
लंके यांना मुंबईतून होत असते खास मदत
निलेश लंके यांचा मुंबईतील कामोठ्यात मोठा कार्यकर्ता वर्ग आहे. तेथे नेहमीच मोठमोठ्या कामांचे नियोजन लंके करत असतात. तेथून खूप मोठी मदतरूपी रसद निलेश लंके यांना मिळत असते. तो एक ओठ आधार निलेश लंके यांच्या पाठीशी असतो. आता हीच रसद तोडण्याचा डाव औटी व विखे यांनी केला आहे.
विखेंसाठी औटी घेणार कामोठ्यात मेळावा
विजय औटी हे खा. सुजय विखे पाटील यांच्या समर्थनार्थ कामोठे येथे येत्या रविवारी (दि. ७ एप्रिल) महिला आणि युवक तसेच अहिल्यादेवीनगरकर परिवार संवाद मेळावा घेणार आहेत.
हा मेळावा कामोठे येथील सेक्टर-११ मधील पोलीस स्टेशनच्या समोरील नालंदा बुद्धविहार मैदानावर पार पडेल. या मेळाव्यास खासदार डॉ. सुजय विखे पाटील, प्रशांत ठाकूर हे उपस्थित असणार आहेत. त्याचप्रमाणे खासकरून पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील सर्व राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व अन्य विविध क्षेत्रांतील मान्यवर मंडळी देखील असतील. सायंकाळी ७ ते रात्री ९ मान्यवरांचे मनोगत त्यानंतर रात्री ९ ते १० स्नेहभोजन होईल.