Ahmednagar Politics : लोकसभेचा संघर्ष आता चांगलाच शिलगु लागला आहे. मेळावे, प्रचारसभा जोरात सुरु झाले आहेत. त्यामुळे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरूचझाले आहेत. निवडणूक म्हटले की आरोप प्रत्यारोपांचा धुराळा उठतच असतो.
निकाल लागला की वातावरण निवळून जाते. दरम्यान आता अहमदनगर लोकसभेत खा.सुजय विखे यांनी जोरदार प्रचार सुरु केला असून विविध मेळावे ते घेत आहेत. दरम्यान आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवारांवर आरोपाचा गौप्यस्फोट केला आहे.
काय म्हणाले मंत्री विखे
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे स्वत:चा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी नगर जिल्ह्यातील नेत्यांमध्ये भांडण लावत असतात. त्यांना अहमदनगरमध्ये उमेदवार देखील मिळत नव्हता. तेव्हा त्यांनी आता आयात केलेला उमेदवार लादून नकारात्मक प्रचार सुरू केल्याचे विखे म्हणाले.
ते मंत्री असताना त्यांनी जिल्ह्यासाठी कधीही नवीन योजना किंवा विकासाचे मुद्दे आणले नाहीत. राज्यात आणि केंद्रात सत्ता पदांवर असताना त्यांना अहमदनगर जिल्ह्याचे भले करता आलेले नाही असे विखे म्हणाले. मतदारांनाही आता काही गोष्टी समजल्या असून जनता त्यांना पुन्हा एकदा मतपेटीतून उत्तर देईल असे त्यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना विखे म्हणाले, अहमदनगरमध्ये गरीब- विरूद्ध श्रीमंत असा निवडणुकीचा मुद्दा नव्हताच. आयात केलेल्या उमेदवारांमार्फत नकारात्मक राजकारण खेळले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
अहमदनगरमधील राजकीय वातावरण अस्थिर ठेवायचे, सतत नेत्यांमध्ये भांडणे लावायची हेच प्रकार पवारांकडून केले जात असून जिल्ह्यासाठी कधीही नवीन योजना त्यांनी आणलेल्या नाहीत, आता आमचा संघर्ष या लादलेला उमेदवाराविरूद्ध नव्हे तर थेट पवार यांच्या या भूमिकेविरूद्धच राहील असेही त्यांनी म्हटले.
लंके यांच्यावरही टीका
उमेदवार नीलेश लंके यांचे नाव न घेता त्यांच्यावरही त्यांनी टीका केली. ते म्हणाले, औद्योगिक वसाहती या लोकांना रोजगार मिळवून देण्यासाठी असतात परंतु तेथे दहशतीचे वातावरण निर्माण केले जात असल्याचे चित्र आहे.
प्रत्येक तालुक्यात भूसंपादन करून एमआयडीसी उभे करणे ही अशक्य बाब असते. जेथे सरकारी जागा उपलब्ध आहेत तेथे त्या उभ्या करणे गरजेचे असते.आम्ही अलीकडेच अशा तीन ठिकाणी एमआयडीसी मंजूर केल्याने जिल्ह्याची प्रगती होणार असल्याचे विखे पाटील म्हणाले.