‘मी भाजपाचा खानदानी कार्यकर्ता आहे, पण….’, आमदार राम शिंदे यांचे विखे यांच्या उमेदवारीबाबत मोठं विधान

Tejas B Shelar
Published:
Ahmednagar Politics Ram Shinde On Sujay Vikhe

Ahmednagar Politics Ram Shinde On Sujay Vikhe : 2019 मध्ये नगरच्या राजकारणात एक मोठी घटना घडली. त्यावेळी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी डॉक्टर सुजय विखे पाटील काँग्रेसमधून भाजपा मध्ये आले.

त्यांचे भाजपावासी होण्याचे निमित्त होते लोकसभेची उमेदवारी. ते निमित्त भाजपामध्ये आल्यानंतर साध्य झाले. त्यांना दिवंगत दिलीप गांधी यांच्या जागेवरून म्हणजेच नगर दक्षिण मधून तिकीट मिळाले.

निवडणुकीत विखे पाटील यांनी संग्राम जगताप यांचा दारुण पराभव केला. तत्कालीन पालकमंत्री या नात्याने राम शिंदे यांनी सुजय विखे यांच्या विजयात महत्त्वाची भूमिका निभावली. यानंतर खासदार महोदय यांचे वडील अर्थातच वर्तमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे देखील भाजपामध्ये आलेत.

दोघे पिता-पुत्र भाजपामध्ये आल्यानंतर मात्र पक्षाला विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यात मोठा फटका सहन करावा लागला. राम शिंदे यांचा देखील 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. त्यांनी त्यांच्या पराभवाचे खापर विखे पिता पुत्र यांच्यावर फोडले.

त्यांनी याबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रारही केली. तेव्हापासून आमदार राम शिंदे आणि विखे यांच्यात कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. नगर भाजपामध्ये तेव्हापासून विखे आणि शिंदे असे दोन गट झालेत. मध्यंतरी देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत बोलतांना हे पेल्यातील वादळ असल्याचे म्हटले होते. मात्र हे पेल्यातील वादळ अलीकडील काही काळात त्सुनामीचे रूप घेऊ पाहत होते.

राम शिंदे यांनी तर नगर दक्षिण मधून लोकसभा लढवण्याची इच्छा देखील बोलून दाखवली होती. पण, भाजप पक्षश्रेष्ठीने पुन्हा एकदा सुजय विखे यांच्यावरच नगर दक्षिणची जबाबदारी सोपवली. यामुळे सुजय विखे यांना यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे आव्हान तर स्वीकारावंच लागेल पण पक्षांतर्गत सुरू असलेल्या विरोधाचा देखील सामना करावा लागणार अशा चर्चा रंगत होत्या.

अशातच, मात्र पेल्यातील वादळाचे त्सुनामीमध्ये रूपांतर होण्याआधी फडणवीस यांनी आपल्या हातात सूत्र घेतलीत. विखे आणि शिंदे यांच्यामधील नाराजी दूर करण्यासाठी त्यांनी काल अर्थातच रविवारी सागर बंगल्यावर महत्त्वाची बैठक घेतली. राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार राम शिंदे या बैठकीत उपस्थित होते.

विशेष म्हणजे या बैठकीतून तोडगा निघाला देखील. खरंतर सुजय विखे यांनी आधीच भाजपाच्या आढावा बैठकीत कार्यकर्त्यांची माफी मागत जाहीर माफीनामा सादर केला होता. तसेच राधाकृष्ण विखे पाटील यांनी राम शिंदे यांच्या समवेत बंद दाराआड चर्चाही केली होती.

मात्र या साऱ्या गोष्टी फेल ठरल्यासारख्या वाटल्यात. म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सागर बंगल्यावर या तिन्ही नेत्यांना बोलावून त्यांच्यामधील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे तो प्रयत्न यशस्वी झाला. राम शिंदे यांनी मागील घटनाक्रम विसरून सुजय विखे यांना विजयी बनवणार असा विश्वासही व्यक्त केला.

खरंतर राम शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांचे खूपच जवळचे नेते मानले जातात. देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारानेच विधानसभेत पराभवाचा सामना करावा लागला असतानाही रामभाऊ यांना विधान परिषदेतून आमदार बनवले गेले. यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी विखे आणि शिंदे यांच्यातली नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला अन तो यशस्वी झाला. दरम्यान कालच्या बैठकीनंतर आमदार राम शिंदे यांनी माध्यमांसोबत देखील संवाद साधला.

मी खानदानी कार्यकर्ता 

प्रसारमाध्यमांशी बोलताना राम शिंदे यांनी “माझ्या मनात काही प्रश्न होते, शंका होत्या. मी लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक होतो. मात्र केंद्रीय पार्लमेंट्री बोर्डाने सुजय विखे पाटील यांना पुन्हा उमेदवारी दिली. मी भाजपचा निष्ठावान आणि खानदानी कार्यकर्ता आहे. मात्र मनात असलेले प्रशांची सोडवणूक होणे गरजेचे होते,” अस म्हणतं आपल्या मनातली खदखद बोलून दाखवली.

फडणवीस यांची यशस्वी मध्यस्थी 

पुढे बोलतांना आमदार महोदय यांनी फडणवीस यांनी यशस्वी मध्यस्थी केली असल्याची कबुली दिली. ते म्हटलेत की, ‘आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर मी माझे सर्व मुद्दे मांडले. शेवटी मनात असलेल्या दुःख, अडचणी, प्रश्न नेतृत्वाने ऐकले पाहिजे, समजून घेतले पाहिजे आणि आपले म्हणणे ऐकून घेतले जात असेल तर नेतृत्वाचा आदेश मानला पाहिजे. आता निवडणुकीला जास्त काळ राहिलेला नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चारसौ पारचा नारा दिला आहे. त्यामुळे फडणवीस यांच्या समोर अडचणी मांडल्या, त्यांनी यशस्वी मध्यस्थी केली आहे, अस म्हणतं विखे आणि शिंदे यांच्यातली नाराजी दूर झाल्याचे स्पष्ट केले आहे.

नगरचा खासदार पुन्हा सुजय विखे पाटील…! 

यावेळी राम शिंदे यांनी नगर दक्षिण चा खासदार हा भारतीय जनता पक्षाचाच असेल असा विश्वास व्यक्त केला आहे. यासंदर्भात बोलताना शिंदे यांनी, ‘माझ्या सर्व अडचणी-प्रश्नांचे निराकरण झालेले आहे. नेतृत्वाने आदेश दिलेला आहे, त्यामुळे नगर दक्षिणेचा खासदार हा बीजेपीचा झाला पाहिजे यासाठी मी पूर्ण ताकतीने काम करणार,’ अस आश्वासन दिल आहे.

यामुळे सुजय विखे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील हे राम शिंदे यांची नाराजी दूर करण्यास समर्थ ठरले असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहेत. यामुळे सुजय विखे पाटील यांना निश्चितच निवडणुकीत फायदा होऊ शकतो यामुळे नगर भाजपामधील अंतर्गत शीतयुद्ध समाप्त होईल असे देखील आता भासू लागलं आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe