Ahmednagar Politics : सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 ला संपत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून येत्या काही दिवसांत आगामी लोकसभेच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे आता कोणत्याही क्षणी निवडणुकांच्या तारखा घोषित होणार असा अंदाज आहे. ज्या दिवशी निवडणुकांच्या तारखा घोषित होतील त्या दिवसापासून आचारसंहिता देखील लागू होणार आहे.
अशा परिस्थितीत, आता राजकीय पक्षांच्या माध्यमातून आगामी लोकसभा निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. राजकीय पक्ष उमेदवार फायनल करून अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करण्यात व्यस्त आहेत. भाजपा आणि काँग्रेसची पहिली यादी नुकतीच जारी झाली आहे.
आपल्या महाराष्ट्रात मात्र अजूनही कोणत्याच पक्षाची अधिकृत उमेदवारांची यादी समोर आलेली नाही. महायुतीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून गदारोळ सुरू असल्याने अजून दोन्ही गटांकडून अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर झालेली नाही. मात्र, काही लोकसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे.
असेच काहीसे चित्र नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात देखील पाहायला मिळत आहे. ही जागा महायुतीमध्ये भाजपाच्या वाट्याला जाते आणि महाविकास आघाडीमधून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या गटाच्या ताब्यात जाण्याची शक्यता आहे. भाजपाकडून या जागेवर विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे यांना तिकीट दिले जाऊ शकते अशा चर्चा आहेत.
दुसरीकडे, शरद पवार यांच्या गटाकडून या जागेवर कोण उमेदवार उभे राहणार हे अद्याप गुलदस्त्यात असल्याचे पाहायला मिळत आहे. खरेतर जेव्हा राष्ट्रवादी एकसंध होती तेव्हा या जागेवर राष्ट्रवादीकडून निलेश लंके यांना संधी दिली जाणार अशी चर्चा होती. राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांची देखील अशीच इच्छा होती. खरेतर, नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ हा गेल्या काही पंचवार्षिकीपासून भाजपाच्या ताब्यात आहे.
सध्याचे खासदार सुजय विखे पाटील यांच्याआधी या जागेवरून भाजपाचे दिलीप गांधी हे तीन वेळा खासदार राहिले आहेत. 2019 मध्ये मात्र डॉक्टर सुजय विखे पाटील हे भाजपामध्ये प्रवेश करून खासदार बनले आहेत आणि आता 2024 साठी देखील ते इच्छुक आहेत. दुसरीकडे अजितदादा यांच्या गटात समाविष्ट असलेल्या पारनेरचे आमदार निलेश लंके हे देखील नगर दक्षिणमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.
असे संकेतही त्यांच्याकडून वारंवार मिळत आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी त्यांनी शिवपुत्र संभाजी हे महानाट्य नगर शहरात आयोजित करून लोकसभेसाठी होमग्राउंड तयार करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे शरद पवार यांच्या गटातील खासदार अमोल कोल्हे यांच्या अभिनयाने सजलेले शिवपुत्र संभाजी या महानाट्यदरम्यान अमोल कोल्हे यांनी निलेश लंके यांना पुन्हा एकदा शरद पवार यांच्या सामील होण्याचे खुले निमंत्रण देखील दिले.
विशेष म्हणजे शरद पवार यांच्या गटाकडून नगर दक्षिणमधून उभे रहा असे निमंत्रण त्यांनी यावेळी दिले हे विशेष. यामुळे नगरच्या राजकीय वर्तुळात डॉक्टर सुजय विखे यांच्या विरोधात निलेश लंके अशी लढत रंगणार अशा चर्चा आहेत. या पार्श्वभूमीवर निलेश लंके यांच्या गटाकडून आणि डॉक्टर सुजय विखे यांच्या गटाकडून वेगवेगळ्या कार्यक्रमांच आयोजन केले जात आहे. सुजय विखे पाटील यांचा गट सध्या सांस्कृतिक कार्यक्रमांवर भर देत आहे.
विशेष म्हणजे या कार्यक्रमाला सुजय विखे यांची पत्नी धनश्री विखे ह्या देखील सामील होत आहेत. दुसरीकडे, लंके यांच्या माध्यमातून आयोजित होणाऱ्या कार्यक्रमांना त्यांच्या अर्धांगिनी राणी लंके देखील हजेरी लावत आहेत. राणी लंके यांनी मध्यंतरी मतदारसंघातून शिवस्वराज्य यात्रा काढली होती. त्यावेळी त्यांनी आपण लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे म्हटले होते. कोणत्याही परिस्थितीत, आगामी लोकसभेसाठी उभे राहणार हे त्यांनी सांगितले होते.
एकंदरीत आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये नगर दक्षिणमधून एक तर निलेश लंके विरुद्ध सुजय विखे पाटील यांची लढत पाहायला मिळेल. नाहीतर, राणी लंके विरुद्ध धनश्री विखे किंवा मग सुजय विखे यांच्या मातोश्री शालिनी विके यांच्या आत लढत पाहायला मिळू शकते, अशा चर्चा सध्या नगरच्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहेत. यामुळे नगर दक्षिणमधून भाजपाकडून आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून नेमके कोण उभे राहणार ? हे खरच पाहण्यासारखे राहणार आहे.