Ahmednagar Politics : लोकसभा निवडणुकांमधील चौथ्या टप्प्यामधील मतदान 13 मे रोजी होणार असून अहमदनगर व शिर्डी या दोन्ही मतदार संघाचे मतदान याच दिवशी होणार आहे. दरम्यान खा. सुजय विखे व निलेश लंके यांच्या प्रचारसभांचा धडाका सुरु आहे.
निलेश लंके यांच्यासाठी शरद पवार हे नगरमध्ये तब्बल सहा घेत आहेत. त्यातील एक आज श्रीगोंदे येथे सभा पार पडली. यावेळी त्यांनी तुफान फटकेबाजी करत श्रीगोंदेची सभा गाजवली. यावेळी खासदार संजय राऊत,
आ.बाळासाहेब थोरात, माजी आमदार राहुल जगताप, स्टार प्रचारक नितेश कराळे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, साजन पाचपुते आदी नेते मंडळी उपस्थित होते.
शरद पवारांची फटकेबाजी
या जाहीर सभेत बोलताना शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्या अतृप्त आत्म्याच्या टीकेवर जोरदार प्रहार चढवत हल्लाबोल केला. ते म्हणाले मोदी हे वय मोजण्यात गफलत करत आहेत. हा आत्मा ५० नव्हे ५६ वर्षांपासून फिरत आहे.
कारण मला राज्यातील विधानसभेत येऊन यंदा ५६ वर्ष झालीत. तेव्हापासून शेतकऱ्यांसाठी फिरतोय असे ते म्हणाले. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, या ५६ वर्षात मोदींसारखे पंतप्रधान पाहिले नसल्याचा घणाघात त्यांनी केलाय.
सामान्यांच्या मनातून आपल्याला हद्दपार करण्यासाठी मोदी सभा घेत असले तरी त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांचे कोणते प्रश्न सोडवलेत? ते सांगावे. एकीकडे गुजरातमधील कांद्याच्या निर्यातीला परवानगी असून दुसरीकडे मात्र महाराष्ट्रातील कांद्याला निर्यातीसाठी परवानगी नसल्याचा घणाघात त्यांनी केला आहे.
प्रभू श्रीराम व तेहत्तीस कोटी देवांनीच आता मोदींना पाडायच ठरवलंय..
निलेश लंके यांच्यातील शिवसैनिक जागा असून धमण्यात भगव रक्त व विचार आजही तेच आहेत. श्रीगोंद्यातील जनता जागरूक व अभ्यासू असल्याने विजय सोपा आहे. मागील दहा वर्षात मोदी कधी महाराष्ट्रात आले की, आठ दिवसांपूर्वीच समजायचं, मात्र काल नगर मध्ये आल्याचे आज समजलं.
यावेळी प्रभू श्रीराम, तेहत्तीस कोटी देवांनीच मोदींना पाडायच ठरवलय असे वक्तव्य यावेळी खासदार संजय राऊत यांनी केले.