Ahmednagar Politics : लढत विखे लंके यांची, प्रतिष्ठा पणाला कोतकर गट व विरोधकांची ! केडगावात वेगळाच राजकीय धुरळा

Ahmednagarlive24 office
Published:
lanke

Ahmednagar Politics : लोकसभा निवडणुकीसाठी मतदान जसजसे जवळ येऊ लागले तसतसे राजकीय वातावरणही अगदी वरच्या लेव्हलपर्यंत गेले आहे. सध्या अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर प्रत्येक ठिकाणी स्थानिक राजकारण पाहूनच प्रचार केला जात आहे.

असेच वातावरण केडगावमध्येही पाहायला मिळत आहे. राजकीय फाईट ही खा. डॉ. सुजय विखे व नीलेश लंके यांच्यात असली, तरी केडगावला मात्र स्थानिक पातळीवरती कोतकर गट व विरोधी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

शिवसेना शिंद गटाचे नगर शहर जिल्हाध्यक्ष दिलीप सातपुते हे महायुतीतील घटक पक्षाचे पदाधिकारी असले, तरी केडगावमध्ये ते प्रचारापासून अलीप्त असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या समर्थक कार्यकत्यांनी लंकेच्या प्रचारात झोकून दिले आहे.

मागील लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्यासाठी कोतकर गट सक्रिय होता, तर सुजय विखे यांच्या प्रचाराची धुरा दिलीप सातपुते यांनी पेलली होती. या निवडणुकीत नेमकी उलट परिस्थिती दिसून येत आहे.

विखे यांच्यासाठी कोतकर गटाकडून सचिन कोतकर यांनी पदयात्रा काढून केडगावातील उपनगरे पालथी घातली आहेत. केडगावमधील विकासकामांसाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दोन्ही गटांना निधी दिला होता. मागील सहा महिन्यांपासून विखे गटाकडून आयोजित केलेल्या देवदर्शन सहली,

साखर व डाळ वाटप, आरोग्य शिबिरे या आयोजनात कोतकर गटाला बरोबर घेतले होते. तेव्हापासून विरोधी शिवसेनेचा गट विखे यांच्यापासून फटकून राहू लागला. विखे गटाकडूनही ही दरी कमी करण्याचा प्रयत्न केला गेला नाही असे म्हटले जाते.

केडगावात लंके यांनी शाहूनगर, भूषणनगर, केडगाव देवी परिसरात सभा घेतल्या. विखे यांनी केडगाव देवी, नेप्ती रोड परिसरातील भंडाऱ्यांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहून मतदारांशी संवाद साधला.

सध्या दोन्ही गटांकडून आगामी महापालिका व विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून स्थानिक पातळीवर आपले वर्चस्व अबाधित राखण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. कोतकर गटाकडून विकासाच्या मुद्दे, तर विरोधी गटाकडून दहशतीचे मुद्दे मांडले जात आहेत.

निवडणूक विखे विरुद्ध लंके असली, तरी स्थानिक पातळीवर मात्र कोतकर व विरोधी गटाकडून प्रतिष्ठा पणाला लावली जात असल्यामुळे केडगावात वेगळाच राजकीय धुरळा उडत असल्याचे दिसून येत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe