Ahmednagar Politics : पाच वर्षांनी पुन्हा एकदा जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्रात लोकशाहीचा महाकुंभ सजला आहे. 18 व्या लोकसभेसाठी देशात निवडणुका सुरू आहेत. संपूर्ण देशभरात एकूण सात टप्प्यात आणि आपल्या महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. याच पार्श्वभूमीवर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुतीमध्ये आणि महाविकास आघाडी मध्ये राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे.
महायुतीचे अधिकृत उमेदवार सुजय विखे पाटील तथा महायुतीमधील इतर मुरब्बी नेते आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके तथा आघाडीमधील अनेक ताकतवर नेते प्रचारात गुंग आहेत. आपल्याच उमेदवाराचा विजय व्हावा यासाठी राजकीय समीकरणे जुळवली जात आहेत.
आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण देखील पाहायला मिळत आहे. खरेतर विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील हे दुसऱ्यांदा लोकसभेच्या निवडणुकीत उभे राहिले आहेत. भारतीय जनता पक्षाने त्यांना दुसऱ्यांदा या जागेवरून तिकीट दिले आहे.
गेल्यावेळी अर्थातच 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सुजय विखे यांच्या विजयात नगर शहरातील मताधिक्याचा मोठा वाटा होता. यावेळी देखील जो कोणी येथून खासदार होईल त्याच्या विजयात नगर शहर विधानसभा मतदारसंघ निर्णायक भूमिका निभावणार असे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
गेल्यावेळी येथून शिवसेनेचे दिवंगत उपनेते अनिल भैया राठोड हे सुजय विखे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. मात्र अनिल भैया यांचे कोरोना काळात निधन झाले. पुढे राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर एक नवीन प्रयोग झाला.
भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची गेल्या अनेक वर्षांपासूनची युती तुटली. यानंतर मात्र राज्याच्या राजकारणात दोनदा उलथापालथ झाली. पहिल्यांदा शिवसेनेत उभी फूट पडली आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट तयार झालेत.
पण, अनिल भैय्या यांचे पुत्र विक्रम राठोड यांनी ठाकरे गटातच राहण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान आता शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. यावेळी सुजय विखे यांच्या पाठीशी अनिल भैया आणि त्यांचे कडवे सैनिक नाहीयेत. पण नगर शहरातील आमदार संग्राम जगताप हे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत.
दरम्यान, सुजय विखे यांनी अनिल भैय्या यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. अनिल भैय्या राठोड यांच्या आठवणीने विखे गहिवरलेत. ते म्हणालेत की, ‘अनिलभैय्यांनी माझ्यासाठी जे केले आहे, ते कोणीच करू शकत नाही. त्यामुळे या निवडणुकीच्या धामधुमीत मी त्यांना कधीच विसरू शकत नाही’. पुढे बोलताना खासदार विखे यांनी, ‘भाजपा-शिवसेना नैसर्गिक युती होती, ती तुटली. आम्ही काय त्यांना सोडले नाही. ते महाविकास आघाडीच्या सत्तेत गेलेत. पुढे पक्षाचे विभाजन झाले.
भैय्या यांचे पुत्र विक्रम राठोड ते इकडे आले नाहीत, शिंदे साहेबांकडे आले नाहीत. ते समोर थांबले, पण ते काहीही असो, अनिलभैय्यांचे मूळ हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्व आणि विचारावर आधारीत होते,’ असं म्हणतं नगर शहरात जो मतदार अनिल भैय्या यांना मानत होता तो बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जाणाऱ्या भाजपा अन महायुतीच्या बरोबर राहील असा विश्वास व्यक्त केला आहे.