Ahmednagar Politics : सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 ला संपणार आहे. या पार्श्वभूमीवर 18 व्या लोकसभेसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मतदानाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी मधील घटक पक्ष आता आप-आपल्या अधिकृत उमेदवारांची नावे देखील जाहीर करत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुतीने उमेदवार जाहीर केला आहे. या जागेवर विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना तिकीट मिळाले आहे.
या जागेवरून महाविकास आघाडीचा उमेदवार अजून ठरलेला नाही. दुसरीकडे शिर्डीच्या जागेवर महायुतीने उमेदवार अजून दिलेला नाही. पण येथे महाविकास आघाडी कडून UBT शिवसेना पक्षाने उमेदवार दिला आहे. उबाठा शिवसेनेने या जागेवरून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना संधी दिलेली आहे. यामुळे आता शिर्डी मधून महायुती कोणाला संधी देणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
तसेच नगर दक्षिणमधून महाविकास आघाडीचा उमेदवार कोण राहील हे देखील पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. तथापि, नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाबाबत बोलायचं झालं तर या जागेवरून महाविकास आघाडीकडून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निलेश लंके किंवा त्यांची धर्मपत्नी राणी लंके यांना उमेदवारी देऊ शकते अशा चर्चा पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे लंके यांच्या माध्यमातून तसेच संकेतही मिळू लागले आहेत.
यामुळे सध्या राजकीय वर्तुळात नगर दक्षिण मधून सुजय विखे विरुद्ध निलेश लंके किंवा त्यांची धर्मपत्नी राणी लंके अशी जोरदार लढत होईल असे म्हटले जात आहे. यावेळी नगर दक्षिणचा किल्ला कोण सर करणार ? या जागेवरून कोण विजयी पताका फडकवणार हे निवडणुकीनंतर स्पष्ट होणार आहे. मात्र आज आपण नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांची पॉवर की मोदी यांची लहर कोण वरचढ ठरू शकते याबाबत थोडक्यात विश्लेषण करणार आहोत.
नगर दक्षिण हा भाजपाचा बालेकिल्ला
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्याला कारणही तसेच स्ट्रॉंग आहे. या जागेवरून भाजपाने गेल्या काही पंचवार्षिकी पासून सातत्याने विजयश्री मिळवला आहे. या जागेवर 2019 पूर्वी भाजपाचे दिवंगत दिलीप गांधी खासदार म्हणून विराजमान होते. 2019 साली काँग्रेस मधून सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला आणि त्यांना या जागेवरून उमेदवारी मिळाली. ते पहिल्यांदाच लोकसभेसाठी उभे राहिले होते.
तरीही त्यांनी या निवडणुकीत दोन लाखाहून अधिक मताधिक्यांनी विजय मिळवला. त्यावेळी सुजय विखे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जगताप हे उभे होते. संग्राम जगताप यांचा पराभव झाला पण तरीही त्यांनी खासदार सुजय विखे यांच्या समवेत आपल्या मतदारसंघातील अनेक कामे मार्गी लावून घेतलीत. मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. अजित दादा हे महायुतीमध्ये गेलेत. संग्राम जगताप हे देखील अजितदादा यांच्या समवेत आहेत. यामुळे आज संग्राम जगताप हे सुजय विखे यांच्यासाठी प्रचार करणार असे चित्र आहे.
जो राहुरी विधानसभा मतदारसंघात चांगली कामगिरी करणार त्याचा विजय सोपा होणार
गेल्यावेळीच्या निवडणुकीत सुजय विखे यांना राहुरी मधून चांगले मत मिळाले होते. आता मात्र परिस्थिती थोडीशी बदललेली आहे. कारण की 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राहुरी मतदारसंघात भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला. भाजपचे शिवाजी कर्डिले यांचा पराभव झाला. या जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राजक्त तनपुरे हे निवडून आलेत. यानंतर महाविकास आघाडीचे सरकार आले आणि त्यामध्ये प्राजक्त तनपुरे यांना मंत्रिपद मिळाले. मंत्रीपद मिळाल्यानंतर त्यांनी मतदारसंघात अनेक चांगली कामे केली आहेत. मध्यंतरी शिवसेनेत उभी फूट पडली.
महाविकास आघाडी सरकार कोसळले नवीन सरकार राज्यात स्थापित झाले. नंतर राष्ट्रवादी काँग्रेस फुटली, अजितदादा सत्तेत आलेत. मात्र प्राजक्त तनपुरे यांनी शरद पवार यांच्या समवेतच राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. राहुरी मतदारसंघात त्यांची चांगला पकड आहे. यामुळे या लोकसभेत याचा महाविकास आघाडीला फायदा होणार आहे. महाविकास आघाडीला राहुरी मध्ये आणखी बळस्थान प्राप्त होते ते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाकडून. कारण की, येथे उबाठा शिवसेनेची मोठी ताकद आहे. 2019 मध्ये सुजय विखे यांना विजयी बनवण्यात येथील शिवसैनिकांची भूमिका मोठी निर्णायक ठरली होती.
दरम्यान निवडणुकीत पराभव झाल्यानंतर शिवाजीराव कर्डिले हे विखे यांच्यावर नाराज होते. परंतु त्यांची नाराजी आता दूर झाली आहे. येथे महाविकास आघाडीची म्हणजे उबाठा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद निश्चितच गेल्या काही वर्षात वाढली असल्याचे दिसते. पण, विखे यांच्या राजकारणाची शैली ही थोडीशी भिन्न आहे. अस म्हणतात की भाजपची निवडणुकीत एक विशेष यंत्रणा कार्यरत असते. परंतु निवडणुकीत विखे भाजप यंत्रणावर विश्वास ठेवण्याऐवजी स्वतःचीच यंत्रणा घेऊन काम करतात. विखे यांचा पक्षांतर्गत विरोध त्यांना निश्चितच जड भरणार असे दिसत होते.
परंतु त्यांचे दिल्ली दरबारी असणारे वजन तिकीट तर खेचून आणण्यात यशस्वी ठरलेच आहे शिवाय पक्षात होत असलेला विरोध देखील त्यांनी बऱ्यापैकी नियंत्रणात आणला आहे. याशिवाय मोदी मॅजिकची देखील यंदा या लोकसभा मतदारसंघात कसोटी राहणार आहे. यंदाची निवडणूक ही काटेदार होण्याची शक्यता आहे. यंदा कोणालाही सहजतेने विजय मिळवता येणार नाही. कारण की दोन्ही गट महाविकास आघाडी अन महायुती आता नगर दक्षिण मध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये झालेल्या घडामोडीमुळे पावरफुल बनले आहेत. तथापि नगर दक्षिणमधून ‘अबकी बार कोणाचा खासदार’ हे पाहण्यासाठी 4 जून 2024 ची वाट पहावी लागणार आहे.