एकीकडे देशात व महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून निवडणूक अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे. अद्याप तीन टप्पे निवडणुकांचे बाकी असून महायुतीचा प्रचार जोरदार सुरु आहे. हे एकीकडे सुरु असताना पुन्हा एकदा महाराष्ट्रात राजकीय भूकंप होऊ शकतो अशा चर्चा सुरु आहेत.
त्याचे कारण असे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन दिवसांपासून मोठ्या राजकीय घडामोडी सुरु आहेत. मागील चार ते पाच दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार नॉट रिचेबल झालेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत रोड शो ला, दिंडोरी आणि कल्याणमध्ये सभेसाठी आले होते परंतु या ठिकाणी अजित पवार यांची अनुपस्थितीत जाणवली.
तर दुसरीकडे छगन भुजबळ हे भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा आहेत. नाशिक मध्ये पाहिजे तितके बळ महायुतीला ते देताना दिसत नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांची त्यांच्या फार्महाऊसवर जात भेट घेतली आहे.
त्यातच आता अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शरद पवारांची हॉटेलमध्ये भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे, त्यामुळे आता मोठ्या राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
अजित पवार नॉट रिचेबल
उपमुख्यमंत्री अजित पवार मागील काही दिवसांपासून सभा, रोड शोमध्ये सहभागी होताना दिसलेले नाहीत. मोदींच्या दौऱ्यातही ते न दिसल्याने चर्चा सुरु झाल्या. नाशिकमध्येही ते नव्हते त्यामुळे सध्या त्यांच्या गायब होण्याचा चर्चा सध्या सुरु आहेत.
छगन भुजबळ नाराज व गिरीश महाजनांची धाव
मंत्री छगन भुजबळ हे देखील नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांना नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी न मिळणे हे त्यांचे नाराजगीचे कारण असल्याचे म्हटले जात आहे. शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारात भुजबळ आणि त्यांचे कार्यकर्ते येत नसल्याचे म्हटले जात आहे.
राष्ट्रवादीची ताकद नाशकात महायुतीच्या उमेदवारामागे उभी राहिली नाही असे चित्र दिसत आहे. भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी भुजबळ फार्मवर जात त्यांची मनधरणी केली असल्याचे समजते.
सुनील तटकरे- शरद पवार भेट
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नाशिकमध्ये शरद पवार यांची हॉटेलमध्ये भेट घेतल्याचे समजते. पहाटे साडे चारच्या सुमारास तटकरे नाशिकमधील एका हॉटेलवर गेले होते व तेथे अर्धा तास थांबून पुन्हा आले. विशेष म्हणजे शरद पवारांचा मुक्काम याच हॉटेलात असल्याने आता त्यांच्या भेटीच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. दरम्यान, या भेटीचा तटकरे यांनी इन्कार केला आहे.
दरम्यान अजितदादा गायब, भुजबळ नाराज, तटकरे-शरद पवार भेट या राष्ट्रवादीमधील मोठ्या घडामोडी पाहता पुन्हा राजकीय भूकंप होईल अशी चर्चा काही लोक करतायेत तर काही लोक दोन्ही पवारांनीच मोदींना चक्रव्यूहात अडकवलं का? असा प्रश्न विचारतायेत.