आप – काँग्रेसच्या मतांची बेरीज भाजपचे गणित बिघडू शकते? सत्तास्थापनेपासून ठेऊ शकते दूर? ‘असे’ आहे मतांचे गणित? पहा..

Ahmednagarlive24 office
Published:
politics

लोकसभेसाठी सर्वत्र निवडणुका होत आहेत. महाराष्ट्रामधील अनेक लढती प्रचंड गाजल्या. दरम्यान भाजपने सुरवातीला दिलेला ४०० पार चा नारा आता कुठे मागे पडू लागला असल्याच्या चर्चा आहेत. विरोधकांनी यावेळी एकत्रित केलेली खेळी भाजपचे गणित बिघडू शकते असे म्हटले जात आहे.

दरम्यान यामध्ये ‘आप’ देखील महत्वपूर्ण भूमिका बजावू शकते असे म्हटले जाते. ‘आप’ चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना अटक झाली व ते जामिनावर बाहेर येऊन जबरदस्त प्रचार करत आहेत. यावेळी त्यांना काँग्रेसची देखील साथ आहे. त्यामुळे दिल्लीतील लोकसभेच्या सात जागांसाठी यंदा भाजप, काँग्रेस आणि आप या देशातील तीन राष्ट्रीय पक्षांमध्ये होणारी झुंज लक्षणीय ठरणार आहे.

गेल्या दहा वर्षांपासून दिल्लीत लोकसभेत भाजपचे, तर विधानसभेत ‘आप’ने वर्चस्व गाजविले आहे. दिल्लीच्या राजकारणात सुंभ जळूनही पीळ न गेलेल्या काँग्रेसशी ‘आप’ने केलेली युती भाजपला शह देण्यात कितपत उपयुक्त ठरते हे या निवडणुकीत दिसणार आहे.

‘आप’ आणि भाजपमध्ये वर्चस्वासाठी जोरदार संघर्ष
दिल्लीत काँग्रेसची मक्तेदारी संपविल्यानंतर ‘आप’ आणि भाजपमध्ये वर्चस्वासाठी जोरदार संघर्ष सुरू आहे. २०१९च्या लोकसभेत भाजपने गेल्या दहा वर्षातील ५६.८९ टक्के मतांच्या उच्चांकासह सलग दुसऱ्यांदा सातही जागा जिंकल्या.

त्यावेळी काँग्रेस (२२.५ टक्के) आणि ‘आप’ (१८.१ टक्के) यांच्या मतांच्या बेरजेपेक्षा १६.४९ टक्के मते जास्त मिळवून भाजपचे सर्व उमेदवार विजयी ठरले होते. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत ‘आप’ (३२.९० टक्के) आणि काँग्रेस (१५,१० टक्के) यांच्या मतांची विभागणी ४६.४० टक्के

मतांसह सर्व सात जागा जिंकणाऱ्या भाजपच्या पथ्यावर पडली होती. विधानसभेच्या सलग दोन निवडणुकांमध्ये ५४ टक्के मतांसह ७० पैकी अनुक्रमे ६७ आणि ६२ जागा जिंकणाऱ्या ‘आप’ला अद्याप लोकसभा निवडणुकीत खाते उघडता आलेले नाही.

काँग्रेसच्या मतांची बेरीज निर्णायक ठरण्याची शक्यता
दोन वर्षांपूर्वी, दिल्ली पालिकेच्या २५० जागांसाठीच्या निवडणुकीत आपने ४२.०५ टक्के मतांसह १३४ जागांवर विजय मिळवित सत्ता संपादन केली. त्यावेळी भाजपने ३९.०९ टक्के मतांसह १०४ जागा तर काँग्रेसने ११.६८ टक्के मतांसह ९ जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकीतील ‘आप’-काँग्रेसच्या मतांची बेरीज भाजपपेक्षा जास्त भरली आहे.

मतांचा हा टेंड्र कायम राहिला तर ‘आप’-काँग्रेस आघाडीला भाजपवर बाजी उलटविता येईल पण त्यासाठी काँग्रेसच्या मतांची बेरीज निर्णायक ठरणार असल्याचे म्हटले जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe