Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम चालू आठवड्यात जाहीर होऊ शकतो. सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या गुरुवारी किंवा शुक्रवारी निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे.
केंद्रीय निवडणूक आयोग सोमवार ते बुधवारदरम्यान जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहे. या केंद्रशासित प्रदेशात २०१४ साली शेवटची विधानसभा निवडणूक झाली होती. त्यावेळी भाजप आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाचे सरकार स्थापन झाले होते.
मेहबुबा मुफ्ती या मुख्यमंत्री झाल्या होत्या. २०१८ साली भाजपने पाठिंबा काढल्याने सरकार कोसळले. त्यानंतर राष्ट्रपती राजवट लागली. २०१९ साली मोदी सरकारने कलम ३७० रद्द करत जम्मू-काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशात विभाजन केले.
तेव्हापासून या केंद्रशासित प्रदेशात लोकांनी निवडलेले सरकार नाही. सर्वोच्च न्यायालयाने जम्मू-काश्मीरमध्ये सप्टेंबरपर्यंत निवडणूक घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळेया प्रदेशात लोकसभेसोबतच विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे.
निवडणूक आयोगाच्या दौऱ्यात सुरक्षेचा आढावा घेण्यात येईल. त्यानंतर जम्मू-काश्मीरहून परतल्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त सार्वत्रिक आणि काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा करू शकतात, असे सूत्रांनी सांगितले. निवडणुकीची घोषणा होताच आदर्श आचारसंहिता लागू होईल. त्यामुळे सध्या मोठ्या प्रमाणावर विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन सुरू आहे.