Loksabha Election : लोकशाहीचे महाकुंभ लवकरच सजणार आहे. लवकरच लोकसभेच्या निवडणुका रंगणार आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून सर्व तयारी पूर्ण झाली आहे. आता कोणत्याही क्षणी निवडणूक आयोग निवडणुकीच्या तारखा जाहीर करेल आणि तेव्हापासून आचारसंहिता लागू होईल अशी माहिती समोर येत आहे.
गेल्या चार पंचवार्षिकीचा विचार केला असता मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकांची घोषणा होत असते. यावर्षी देखील तसेच होईल असा अंदाज आहे. तत्पूर्वी मात्र जागा वाटपावरून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये चांगलाच गदारोळ पाहायला मिळत आहे.
महायुतीबाबत बोलायचं झालं तर बुधवारी अमित शहा यांच्यासोबत महायुतीमधील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाची बैठक झाली होती.
या बैठकीत महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याचे बोलले जात होते. मात्र अमित शहा यांच्या समवेत झालेल्या बैठकीत महायुतीचा जागा वाटपाचा तिढा सुटू शकलेला नाही. कारण की आता अजित दादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटातील नेते लवकरच दिल्ली दरबारी कूच करणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार उद्या अर्थात शुक्रवारी महायुतीमध्ये समाविष्ट असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे दिल्लीला रवाना होणार आहेत.
दिल्लीला जाऊन जागा वाटपाबाबत चर्चा होणार आहे. सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आगामी लोकसभेसाठी दोन आकडी जागेची मागणी केली आहे.
अजितदादा यांच्या राष्ट्रवादीने नाशिक, दिंडोरी, गोंदिया-भंडारा, दक्षिण मुंबई, हिंगोली, धाराशिव, रायगड, कोल्हापूर, बुलढाणा, माढा, सातारा, शिरूर, बारामती, परभणी, अहमदनगर दक्षिण, गडचिरोली या 16 जागांचा आढावा घेतला आहे.
विशेष म्हणजे यातील 13 जागेची यादी भाजपाकडे पाठवली आहे. तथापि जागा वाटपावर अजितदादा यांचा गट 11 जागा घेऊन तडजोड करू शकते असे राष्ट्रवादीच्या सूत्रांनी सांगितले आहे.
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना लोकसभेसाठी पक्षाला फक्त चार ते पाच जागेची ऑफर भाजपाने दिली असल्याचे विचारले असता त्यांनी यास इन्कार दाखवला आहे. तसेच पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी देखील यावर भाष्य करण्यास टाळाटाळ केली आहे. मात्र शिवसेनेच्या बरोबरीने त्यांनी जागांचा आग्रह धरला आहे.
शिवसेनेला जेवढ्या जागा मिळतील तेवढ्याच राष्ट्रवादीला देखील मिळाल्या पाहिजेत असे भुजबळ यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. यामुळे आता महायुतीचा जागा वाटपाचा तिढा केव्हा सुटणार आणि भाजप मित्र पक्षांना किती जागा देणार याकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष राहणार आहे.