Maharashtra BJP Candidate List : अठराव्या लोकसभेचा महाकुंभ लवकर सजणार आहे. लोकसभेच्या निवडणुका आता बोटावर मोजण्याइतक्या दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. कोणत्याही क्षणी भारतीय निवडणूक आयोग निवडणुकीच्या तारखा जाहीर करणार आहे. अर्थातच आता लवकरच आचारसंहिता लागू होईल.
दरम्यान, आगामी लोकसभेसाठी राजकीय वातावरण देखील पूर्णपणे तापलेले आहे. राजकीय पक्ष एकीकडे उमेदवार फायनल करत आहेत तर राजकीय नेत्यांनी प्रचार सभेला सुरुवात केली आहे.
नुकत्याच दोन ते तीन दिवसांपूर्वी बीजेपीने आपली पहिली यादी जाहीर केली आहे. मात्र यामध्ये महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचे नाव नव्हते. यावरून महाराष्ट्रातल्या महायुतीचा जागा वाटपाचा तिढा हा अजूनही सुटलेला नसल्याचे स्पष्ट झाले होते.
पण अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत बैठक घेऊन जागा वाटपाचा तिढा सोडला असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.
पण, प्रत्यक्षात अजूनही महायुतीमधला जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. सूत्रांवर जर विश्वास ठेवला तर भाजप एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 10 ते 12 जागा आणि अजितदादा यांच्या गटाला तीन ते चार जागा देण्याच्या मूडमध्ये आहे.
मात्र, अजितदादा यांच्या गटाने शिवसेनेला जेवढ्या जागा मिळतील तेवढ्या जागा आम्हालाही मिळाल्या पाहिजेत अशी भूमिका घेतलेली आहे. यामुळे महायुतीचा जागा वाटपाचा तिढा केव्हा सुटणार ? हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.
तत्पूर्वी मात्र केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेल्या एका वक्तव्याची आणि कृतीची सध्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आहे. खरेतर आज रावसाहेब दानवे नाशिक मध्ये होते.
यावेळी त्यांना प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी नाशिकमध्ये रावसाहेब दानवे यांना महायुतीच्या जागावाटपाविषयी विचारलं असता त्यांनी आपल्या खिशात असलेली यादीच वाचून दाखवली होती.
प्रसारमाध्यमांनी दानवे यांना जागा वाटपाबाबत विचारलं असता त्यांनी खिशात हात घातला अन एक कागद दाखवला अन म्हटले की, “हे कागद आहेत कालचे आहेत, कॅमेरा नको मारुस याच्यावर. धुळे, जळगाव, रावेर, भंडारा, अकोला, गडचिरोली, नाशिक, पालघर, भिवंडी हे सगळ्या महाराष्ट्रातले उमेदवारच आहेत.
आमची कालच याबद्दल चर्चा झाली.” पण ही यादी काही त्यांनी पत्रकारांना दाखवली नाही. पण ही यादी त्यांनी वाचून दाखवली. यामुळे दानवे यांच्या या कृतीची चांगलीच चर्चा रंगली आहे.तसेच, लवकरच महायुतीचा जागा वाटपाचा तिढा सुटेल आणि शिंदे यांच्या गटाला तसेच अजितदादा यांच्या गटाला किती जागा मिळतील हे स्पष्ट होईल असे दिसत आहे.