Maharashtra Politics : सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जूनला समाप्त होणार आहे. तत्पूर्वी भारतीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून 18 व्या लोकसभेसाठी निवडणुका घेतल्या जाणार आहेत. निवडणूक आयोग 15 मार्चपर्यंत निवडणुकांच्या तारखा डिक्लेअर करेल असे वृत्त काही प्रसारमाध्यमांमधून समोर आले आहे. जेव्हा निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील तेव्हाच देशात आचारसंहिता लागू होईल.
या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या माध्यमातून आगामी निवडणुकीसाठी उमेदवार फायनल केले जात आहेत. तथापि, अजूनही महायुतीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा गुंता पूर्णपणे सुटलेला नाही. परंतु लवकरच हा गुंता सुटेल आणि सर्व पक्षांकडून आगामी लोकसभेसाठी उमेदवारांची नावे जाहीर होणार आहेत.

अशातच, मात्र आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात कोण बाजी मारणार ? महाराष्ट्रात भाजप आघाडी घेणार की महाविकास आघाडी काही मोठा उलटफेर करणार ? या संदर्भात सकाळ वृत्त समूहाने एक महत्त्वाचा सर्व्हे केला आहे. या सर्वेक्षणात अठराव्या लोकसभेमध्ये महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघात कोणाला विजय मिळणार ? याचा अंदाज मांडण्यात आला आहे.
आगामी निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळू शकतात ? याचा अंदाज या सर्वेक्षणातून समोर आला आहे. दरम्यान, आता आपण या सर्वेक्षणातून कोणत्या पक्षाला किती टक्के मतदान होऊ शकतं याबाबत समोर आलेली आकडेवारी थोडक्यात समजून घेणार आहोत.
अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्राचा कल कोणत्या पक्षाकडे ?
सकाळ वृत्तसंस्थेने हे सर्वेक्षण करताना जवळपास 35 हजार लोकांची मते जाणून घेतली आहेत. केंद्र सरकारच्या कामावर आपण समाधानी आहात का ? असा प्रश्न या हजारो नागरिकांना विचारला गेला होता. यावर उत्तर देताना ४०.४ टक्के लोकांनी केंद्र सरकारच्या कामावर समाधान व्यक्त केले आहे.
मात्र ४४.५ टक्के लोकांनी केंद्र सरकारच्या कामावर असमाधान व्यक्त केले आहे. अर्थातच असमाधानी लोक समाधानी लोकांपेक्षा अधिक आहेत. दुसरीकडे १५.१ टक्के लोकांनी यावर काही सांगता येत नाही, असं उत्तर दिल आहे.
लोकसभा निवडणुकीत तुम्ही कोणत्या पक्षाला मतदान कराल ?
या सर्वेक्षणात आगामी निवडणुकीत मतदानासाठी तुम्ही कोणत्या पक्षाला निवडणार असा प्रश्न देखील विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना, ३३.६ टक्के लोकांनी भारतीय जनता पक्षाची निवड केली आहे. १८.५ टक्के लोकांनी काँग्रेसची निवड केली आहे.
१२.६ टक्के लोकांनी शरद पवार यांच्या तुतारी चिन्हाला मत देणार असे म्हटले आहे. ३.९ टक्के लोकांनी अजितदादा यांच्या गटाला मत देऊ असे यावेळी म्हटले आहे.शिवसेना (एकनाथ शिंदे ) यांच्या गटाला ४.९ टक्के लोकांनी मतदान देऊ असे म्हटले आहे. शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला १२.५ टक्के लोकांनी मत देऊ असे म्हटले आहे.
शिवाय मनसे १.४ टक्के, शेकाप ०.३ टक्के, एमआयएम ०.६ टक्के, स्वाभिमानी शेतकरी पक्ष ०.४ टक्के, प्रहार ०.३ टक्के, वंचित ०.३ टक्के, केसीआर यांच्या पक्षाला ०.२ टक्के, आम आदमी पक्षाला ०.५ टक्के, अपक्ष १.३ टक्के आणि इतरला ५ टक्के लोकांनी मत देऊ असे स्पष्ट केले आहे.
यावरून भाजपा पुन्हा एकदा सर्वाधिक मत मिळवणारी पार्टी ठरू शकते असे स्पष्ट होत आहे.तसेच भाजपा, अजितदादा गट आणि एकनाथ शिंदे यांचा गट यांच्या महायुतीला महाविकास आघाडीपेक्षा अधिकचे मत मिळू शकते, असे यावरून स्पष्ट झाले आहे. तथापि हा एक अंदाज आहे. कोणत्या पक्षाला किती मत मिळणार, महायुती बाजी मारणार की महाविकास आघाडी यावेळी काही उलटफेर करणार हे सारे चित्र निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होऊ शकणार आहे.