Ahmednagar News : राज्याच्या आणि केंद्राच्या राजकारणात स्वतःला ग्रेट समजणाऱ्या खासदार शरद पवार यांनी जिल्ह्यासाठी काय योगदान दिले? त्यांच्यामुळे जिल्हा हा विकासाच्या बाबतीत मागे राहिला आहे.
जिल्ह्यात पवारांची भूमिका कायम विखेविरोधी असली, तरी जिल्ह्यातील जनता कायमच आपल्या सोबत राहिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दोन्ही जागा महायुतीलाच मिळतील.
जिल्ह्याचे वाटोळे करण्यात शरद पवार हेच कारणीभूत असल्याची खोचक टीका महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
लोणी बुद्रुक येथे मंत्री विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील, अहमदनगर दक्षिणचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे प पाटील, कार्यकारी अधिकारी सुवर्णाताई विखे,
रणरागिनी महिला मंडळाच्या अध्यक्ष धनश्री विखे, डॉ. सुष्मिता विखे पाटील, मोनिकाताई सावंत इनामदार, ध्रुव पाटील विखे या विखे पाटील परिवाराने ग्रामदैवत म्हसोबा महाराज यांचे दर्शन घेऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
यावेळी माध्यमाशी संवाद साधताना मंत्री विखे पाटील यांनी शरद पवारांवर निशाणा साधत सांगितले, की १० वर्षे कृषी मंत्री म्हणून राहिलेल्या शरद पवार यांनी शेतकऱ्यांचे कोणते प्रश्न सोडविले? जिल्ह्यामध्ये केवळ विखे पाटलांना विरोध म्हणून कायमच त्यांनी संघर्ष केला; परंतु या संघर्षाला येथील मतदाराने कधीही थारा दिला नाही.
जिल्ह्यातील जनतेला नेहमीच पाण्यासाठी संघर्ष करायला लावणारे शरद पवार यांनी कुकडीचा पाणी प्रश्न निळवंडे धरण त्याचबरोबर घाटमाथ्याचे पाणी वळवण्यासाठी नेहमीच विरोधात भूमिका घेतली आहे. ते मुख्यमंत्री असताना कुकडीचे केवळ १० किलोमीटरचे काम एक करू शकले; परंतु कुकडीच्या पाण्याच्या प्रश्नासह निळवंड्याचे पोट चाऱ्या आणि घाटमाथ्याचे आणि पश्चिमेचे पाणी वळवण्यासाठी यापुढे प्रयत्न करणार आहेत.
जिल्ह्यातील दोन्ही जागा या महायुतीलाच मिळणार आहे. केवळ निवडणूक ही सोशल मीडियावर लढवली गेली. सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेची आणि मतदारांची दिशाभूल करण्याचं काम विरोधी उमेदवाराने केले आहे; पण त्यांनी खुद्द पारनेरमध्ये साडेचार वर्षांमध्ये काय विकास केला, हे जनतेला माहिती होतं. त्यामुळे या ठिकाणाहून डॉ. सुजय विखे पाटील यांचा विजय हा निश्चित आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधीदेखील आपल्या मतदारसंघातून पराभूत होतील. कारण राहुल गांधी आणि काँग्रेसची जी प्रतिमा पूर्वी होती. ती आता राहिली नाही. अनेक जुने जाणकार नेते काँग्रेसला केवळ राहुल गांधींच्या धोरणामुळे सोडून गेल्याने आज काँग्रेसचे मोठे वाटोळे झाले आहे.
माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे जिल्ह्यात स्वतःला ज्येष्ठ नेते समजत असले, केवळ विखे पाटलांना विरोध म्हणून या निवडणुकीमध्ये वातावरण निर्मिती केली असली तरी या निवडणुकीमध्ये जनता विरोधकांना धडा शिकवेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून येणाऱ्या काळात पश्चिमेचे पाणी रोजगार शेतीचे प्रश्न यासाठी पुन्हा एकदा केंद्रात नरेंद्र मोदींचं सरकार येईल आणि राज्यात आणि देशात ४०० पारचा जो नारा दिला आहे, तो पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले.