Maharashtra News : महाविकास आघाडीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला येणाऱ्या लोकसभेच्या दहा ते अकरा जागांवरील उमेदवारांसंदर्भात चर्चा पूर्ण झाली आहे.
येत्या एक-दोन दिवसांत या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुवारी राष्ट्रवादी भवन येथील पत्रकार परिषदेत दिली.
पाटील पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या केंद्रीय संसदीय कार्यकारी समितीची बैठक बुधवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडली.
या बैठकीमध्ये पक्षाचे उमेदवार ठरवण्याची प्रक्रिया आम्ही पूर्ण केली आहे. पक्षाकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले उमेदवार देखील भेटून गेले आहेत. त्यामुळे येत्या एक-दोन दिवसांत आम्ही बैठक घेऊन सर्व उमेदवार जाहीर करणार आहोत.
हातकणंगले मतदारसंघाबाबत बोलताना पाटील म्हणाले की, हातकणंगले जागेबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आम्ही शिवसेना (ठाकरे) पक्षाला दिला आहे. त्यामुळे या जागेचा निर्णय उद्धव ठाकरे हेच घेतील.
या जागेवरून राजू शेट्टी इच्छुक आहेत. केंद्र सरकारने आणलेले शेतकरी विरोधी कायदे, शेतकरी विरोधी निर्णय घेतले हे राजू शेट्टी यांना अमान्य असतील, तर राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सोबत यावे.
महाविकास आघाडीतील वादासंदर्भात बोलताना पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. एक-दोन जागांच्या बाबतीत सुरू असलेली चर्चा लवकरच पूर्ण होईल.
त्यामुळे महाविकास आघाडीत सामंजस्याचे वातावरण असून सर्व पक्षांचा एकमेकांशी चांगला संवाद आहे.
गोविंदाचे चित्रपट आता चालत नाहीत
अभिनेते गोविंदा आहुजा यांनी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. याविषयी प्रतिक्रिया देताना जयंत पाटील यांनी, गोविंदांचे चित्रपट आता चालत नाहीत, त्यांचा शेवटचा चित्रपट फ्लॉप गेला, त्यामुळे एखादा चालणारा नट तरी शिवसेनेने घ्यायचा, असा टोला शिंदे यांना लगावला.