“काही लोकांनी त्याच्या मनात हवा घातली आहे की तू खासदार होशील म्हणून, पण….”, निलेश लंके यांच्या घरवापसीवर अजितदादांची पहिली प्रतिक्रिया

Published on -

Nilesh Lanke News : लोकसभा निवडणुकांपूर्वीच अहमदनगर जिल्ह्यातून एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून पारनेरचे आमदार निलेश लंके हे अजितदादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देतील आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील अशा चर्चा होत्या. आता या चर्चा मात्र खऱ्या ठरणार असे वाटतं आहे. कारण की, निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून निलेश लंके हे शरद पवार यांच्या गटात सामील होणार असा दावा करण्यात आला आहे.

आज पुण्यात सुप्रिमो शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार अशी बातमी समोर येत आहे. खरेतर काल भाजपाने आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये नगर दक्षिणमधून डॉक्टर सुजय विखे पाटील यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. वास्तविक, विखे यांनाच येथून उमेदवारी मिळणार हे आधीच स्पष्ट होते.

जरी सुजय विखे यांना पक्षांतर्गत विरोधाचा सामना करावा लागत होता तरीदेखील या जागेवर भाजपाची मजबूत पकड पाहता आणि सद्यस्थितीला भाजपाकडे नगर दक्षिण मधून सुजय विखे यांना पर्याय नसल्याने त्यांनाच तिकीट दिले जाणार असे मत जाणकारांनी व्यक्त केले होते.

दरम्यान, काल सुजय विखे यांना तिकीट मिळाले आहे. यामुळे आता नगर दक्षिणमधून लोकसभा निवडणूक लढवू इच्छिणारे निलेश लंके हे घरवापसी करतील आणि नगर दक्षिण मधून आगामी लोकसभा तुतारी या चिन्हावर लढवतील अशा चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत.

दरम्यान यावर अजितदादा यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. खरंतर लोकसभा निवडणुका झाल्यात की, लगेचच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. यामुळे निलेश लंके यांनी पक्ष सोडल्यास अजितदादा यांच्या गटाचे मोठे नुकसान होणार असे बोलले जात आहे. यामुळे प्रसारमाध्यमांनी अजितदादा यांच्याशी या संदर्भात चर्चा केली आहे. यावर अजितदादांनी आपल्या शैलीतच उत्तर दिले आहे.

काय म्हटलेत अजित पवार ?

निलेश लंके यांच्या घरवापसीसंदर्भात सुरू असलेल्या चर्चांवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अजित दादांनी सांगितले की, “कालच निलेश माझ्याकडे आला होता. मी निलेशसोबत चर्चा केली. त्याला काही गोष्टी समजून सांगितल्या.

पण काही लोकांनी त्याच्या मनात हवा घातली आहे की, तू खासदार होशील म्हणून…., पण वास्तव तसं नाहीये. निलेश पारनेरपुरता लोकप्रिय आहे. पण बाकीच्या मतदारसंघात त्याला वाटतं तितकं सोपं नाही. मी त्याला सांगितलं होतं, तू तशा पद्धतीने वागू नको. जितकं समजून सांगणं गरजेचं आहे. तितकं मी केलेलं आहे. आता त्याचा निर्णय आहे.”

निलेश लंके पुण्याकडे रवाना

खरेतर आज सकाळी अशी बातमी आली होती की दहा वाजता निलेश लंके यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश होऊ शकतो. आता मात्र सायंकाळी चार वाजता निलेश लंके यांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आज निलेश लंके यांच्या ‘मी अनुभवलेला कोविड’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.

हे प्रकाशन पुण्यात होणार असून यासाठी निलेश लंके हे पुण्याकडे रवाना झाले आहेत. विशेष म्हणजे या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमादरम्यानच निलेश लंके हे शरद पवार यांच्या गटात प्रवेश करतील असा दावा प्रसारमाध्यमांमध्ये होत आहे. यामुळे आता खरंच निलेश लंके शरद पवार यांच्या गटात जाणार का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe