Nilesh Lanke News : उत्तर महाराष्ट्राचे प्रवेशद्वार अहमदनगरमध्ये सध्या आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले पाहायला मिळत आहे. अशातच काल अहमदनगरचा राजकारणात एक मोठी डेव्हलपमेंट पाहायला मिळाली. अहमदनगरच्या राजकारणातील ही डेव्हलपमेंट घडली ती सांस्कृतिक राजधानी पुण्यात. सध्या नगरसहित संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात निलेश लंके यांचे नाव चर्चेत आले आहे. निलेश लंके हे अजितदादा यांच्या गटाला सोडचिट्टी देऊन शरद पवार यांच्या गटात सामील होतील अशा चर्चा आहेत.
काल पुण्यात निलेश लंके यांनी लिहिलेले ‘मी अनुभवलेला कोविड’ या पुस्तकाचे विमोचन ‘शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस’चे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाले. याच पार्श्वभूमीवर एका पत्रकार परिषदेचे आयोजन झाले होते. दरम्यान काल निलेश लंके हे शरद पवार यांच्या गटात सामील होतील अशा चर्चा होत्या. मात्र अजूनही अधिकृतरित्या शरद पवार यांच्या गटात ते सहभागी झालेले नाहीत.
परंतु, त्यांच्या पक्षप्रवेशाची आता फक्त औपचारिकता बाकी असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान कालच्या या पत्रकार परिषदेत निलेश लंके यांनी पवार साहेबांची अदृश्य ताकद माझ्यासोबत कायमच होती. मी साहेबांना कधीही सोडून गेलेलो नव्हतोच, असे म्हटले आहे. विशेष म्हणजे शरद पवार यांनी देखील निलेश लंके यांचे स्वागत केले असून त्यांच्या पाठीशी कायमच राहणार असे म्हटले आहे.
यामुळे लंके यांचा पक्षप्रवेश निश्चित असल्याचे बोलले जात आहे. यामुळे आगामी लोकसभा निवडणुका आणि त्यानंतर अवघ्या तीन ते चार महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निलेश लंके यांचा हा निर्णय अजितदादा यांच्या गटासाठी एक मोठा सेटबॅक ठरू शकतो असा दावा राजकीय वर्तुळात होत आहे.
लंके तुळजाभवानीच्या दर्शनासाठी
काल शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर आज निलेश लंके हे तुळजापूरला तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आपल्या समर्थकांसमवेत निघाले आहेत. पण त्यांच्या गाडीवर आणि त्यांच्या ताब्यात समाविष्ट असलेल्या गाड्यांवरून अजित दादांचे घड्याळ गायब असून शरद पवार यांची तुतारी पाहायला मिळाली आहे.
यावेळी रस्त्याने जात असताना त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ठिकठिकाणी त्यांचे स्वागत केले जात आहे. रुईछत्तीशी गावात त्यांच्या कार्यकर्त्यांनी डीजे लावून त्यांचा जंगी सत्कार केला आहे. सध्या लंके यांच्या कार्यकर्त्यांमध्ये खूपच जोश पाहायला मिळत आहे. यामुळे लंके यांच्या बदलामुळेच ही नांदी पाहायला मिळत असल्याचे मत व्यक्त होत आहे.
स्वागतावेळीच्या बॅनरची संपूर्ण राज्यात चर्चा
दरम्यान, रुईछत्तिशी गावात निलेश लंके यांच्या स्वागतासाठी एक बॅनर झळकला आहे. या बॅनरवर शरद पवार यांचा फोटो, तुतारी चिन्ह, निलेश लंके, त्यांची पत्नी राणी लंके यांचा एकत्रित फोटो पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या बॅनरवर असलेला मजकूर देखील सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
यामुळे सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात या लक्षवेधी बॅनरची मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. बॅनरवर तुतारी चिन्ह, शरद पवार यांचा फोटो असल्याने लंके यांचा शरद पवार यांच्या गटात प्रवेश झाल्याचे अधिकृतरित्या सांगितले जात नसले तरी देखील त्यांचा प्रवेश हा सुनिश्चित असल्याचे स्पष्ट होत आहे.
निलेश लंके यांनी काय म्हटले आहे ?
निलेश लंके यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर “वस्तादाचा पहिला डाव” असा उल्लेख करण्यात आलेला असून यावर शरद पवार यांचा फोटो आहे. निलेश लंके आणि त्यांच्या धर्मपत्नीचा फोटो या बॅनरवर आहे. विशेष म्हणजे तुतारी हे चिन्ह देखील या बॅनरवर आहे. यामुळे या बॅनरवरून चर्चा होणे स्वाभाविक आहे. यामुळे या संदर्भात निलेश लंके यांना विचारणा झाली असता त्यांनी “आगे -आगे देखो होता है क्या ?” असं फडणवीस स्टाईल उत्तर दिल आहे.
यामुळे त्यांच्या या सूचक वक्तव्याची आणि या बॅनरची सध्या अहमदनगर पासून ते मुंबईपर्यंत सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. यावेळी निलेश लंके यांच्या गाडीसहित त्यांच्या ताफ्यातील सर्वच वाहनांवर तुतारीचे चिन्ह देखील पाहायला मिळाले आहे. लंके हे तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जात असून यावेळी त्यांनी लोकसभा लढवावी म्हणून कार्यकर्ते मातेला साकडे घालणार आहेत.