आमदार निलेश लंके यांची घरवापसी संदर्भात भूमिका बदलली; आता म्हणतात, राजकारणात कधी काय होईल….

Tejas B Shelar
Published:
Nilesh Lanke News

Nilesh Lanke News : येत्या काही दिवसात लोकसभेच्या निवडणुका सुरू होणार आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सध्या महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांमध्ये जागा वाटपावरून गदारोळ सुरू आहे. अजून महायुतीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटप निश्चित झालेले नाही. कोणत्याच पक्षाने महाराष्ट्रातील आपल्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. नुकत्याच काही दिवसांपूर्वी भाजपाने आणि काँग्रेसने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली मात्र यामध्ये महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचे नाव नाही हे विशेष. परंतु जागा वाटपाचा हा गुंता लवकरच सुटणार आहे.

अशातच, मात्र अहमदनगरच्या राजकारणात एक मोठी घडामोड पाहायला मिळत आहे. खरेतर, अजितदादा यांच्या गटातील पारनेरचे आमदार निलेश लंके हे गेल्या काही दिवसांपासून विशेष चर्चेत आले आहेत. लंके हे आगामी लोकसभा निवडणूक नगर दक्षिणमधून लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांनी गेल्या काही दिवसांपासून असे संकेतही दिले आहेत. त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार संघात जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी त्यांनी नगर शहरात शिवपुत्र संभाजी हे महानाट्य देखील आयोजित केले होते.

या महानाट्याच्या आडून त्यांनी लोकसभेसाठी ग्राउंड तयार करायला सुरुवात केली असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात पाहायला मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे लंके हे आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या गटात जाणार अशा देखील चर्चा सुरू आहेत. नगर दक्षिण लोकसभेची जागा महायुतीमध्ये भाजपाच्या वाट्याला जाते. या जागेवर भाजपाचा उमेदवार उभा राहणार हे जवळपास निश्चित आहे. अशा परिस्थितीत महायुती मधून निलेश लंके यांना तिकीट मिळणं जवळपास अशक्य आहे.

हेच कारण आहे की लंके शरद पवार यांच्या गटात सामील होतील आणि हाती तुतारी घेऊन आगामी निवडणूक लढवतील अशा चर्चा पाहायला मिळत आहेत. अमोल कोल्हे यांनी या चर्चांना अधिक जोर देण्याचे काम केले. शिवपुत्र संभाजी या महानाट्याच्या वेळी नगर शहरात शरद पवार गटातील खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांना शरद पवार गटात पुन्हा माघारी परतण्याचे आणि नगर दक्षिण मधून लोकसभा निवडणूक लढवण्याचे निमंत्रण दिले होते.

त्यांची ही खुली ऑफर आल्यानंतर काल अर्थातच 11 मार्च 2024 रोजी निलेश लंके हे शरद पवार यांच्या पक्षात सामील होणार अशी बातमी वेगाने प्रसार माध्यमांमध्ये पसरली. सुप्रीमो शरद पवार यांच्या उपस्थितीत आणि लंके कुटुंबिय यांच्या उपस्थितीत निलेश लंके हे शरद पवार यांच्या गटात येतील असे खात्रीशीर वृत्त काही प्रसार माध्यमांमध्ये पाहायला मिळाले.

मात्र, या बातम्यांमध्ये कोणतेच तथ्य नसल्याचे सुप्रिमो शरद पवार यांनी स्पष्ट केले. यानंतर निलेश लंके यांनी देखील पक्षप्रवेशाच्या फक्त अफवा असल्याचे म्हटले. लंके यांनी स्वतः कोणीतरी अफवा पसरवत असल्याचे सांगितले. आता मात्र निलेश लंके यांचा स्टॅन्ड पुन्हा एकदा बदलला असल्याचे पाहायला मिळाले आहे. कारण की त्यांनी घरवापसी संदर्भात नुकतेच एक महत्त्वाचे विधान केले आहे.

अजितदादा यांच्या गटातील आमदारांमध्ये रंगल्यात निलेश लंके यांच्या चर्चा 

लंके यांच्या घरवापसीबाबत फक्त राजकीय वर्तुळातच चर्चा होत आहेत असे नाही तर अजितदादा यांच्या गटातील आमदारांमध्ये देखील या चर्चा सुरू आहेत. अजितदादा यांच्या गटातील आमदार अमोल मिटकरी यांनी लंके यांनी पक्ष सोडू नये अशी विनंती केली आहे. तसेच, दादा गटातील आमदार आणि मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी एक आमदार गेला तर आम्हाला फरक पडत नाही, असे विधान करून पक्षात काहीतरी शिजतंय हे स्पष्ट केले आहे. दरम्यान या साऱ्या उलट-सुलट चर्चां सुरु असतानाच निलेश लंके यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली नवीन भूमिका स्पष्ट केली आहे.

काय म्हणालेत लंके ?

निलेश लंके यांनी पत्रकार परिषद घेऊन नगरदक्षिणेतून लोकसभा लढवण्याची सहकाऱ्यांची इच्छा असल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही तर, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माझी अनेक महिन्यांपासून तयारी सुरू असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे. तसेच, जनसंपर्क वाढविण्याचा मला छंद आहे. लोकसंपर्क वाढविण्याचा मला नाद आहे. माझा जिल्ह्याभरात संपर्क आहे, असे म्हणतं लोकसभा निवडणुकीची त्यांची तयारी जवळपास पूर्ण झाली असल्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले आहेत.

यावेळी निवडणूक लढवणारच असे त्यांनी म्हटले नाही पण जागा वाटपापर्यंत संयम ठेवू, असे म्हणतं कोड्यात मोठे संकेत दिले आहेत. शरद पवार यांच्या गटाकडून तुम्ही निवडणूक लढवणार या चर्चांना तुम्ही पूर्णविराम देताय का ? असा प्रश्न पत्रकार परिषदेत पत्रकारांनी उपस्थित केल्यानंतर लंके यांनी राजकारण कधी कुठल्या वळणावर जाईल ते सांगता येत नाही, असे म्हटले आहे.

तसेच पुलाखालून आणखी बरंच पाणी जायचंय असे म्हणतं शरद पवार गटात प्रवेश करण्याविषयीच्या शक्यता जिवंत ठेवण्याचे काम लंके यांनी केले आहे. यावरून राजकीय वर्तुळात महायुतीमध्ये ही जागा भाजपाच्या वाट्याला गेल्यानंतर निलेश लंके हे शरद पवार यांच्या गटात माघारी परत जातील आणि तुतारी हाती घेत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रणसिंग फुंकतील अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe