निलेश लंके यांच्या हातात ‘घड्याळ’ की ‘तुतारी’ ? लंके म्हणतात, साहेब…..

Tejas B Shelar
Updated:
Nilesh Lanke News

Nilesh Lanke News : गेल्या काही दिवसांपासून अहमदनगरच्या राजकारणात निलेश लंके यांच्या घरवापसीच्या मोठ्या चर्चा पाहायला मिळत आहेत. निलेश लंके हे सध्या महायुतीमधील अजितदादा यांच्या गटात आहेत. पण, पारनेरचे आमदार निलेश लंके हे लवकरच पुन्हा एकदा शरद पवार यांच्या गटात जाणार अशा चर्चा आहेत.

या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असल्या तरी देखील या चर्चांना 11 मार्चपासून विशेष ऊत आला आहे. 11 मार्चला निलेश लंके हे शरद पवार यांच्या गटात जातील अशी बातमी वेगाने व्हायरल झाली होती. मात्र, शरद पवार आणि निलेश लंके या दोन्हींनी हे वृत्त फेटाळले होते. यामध्ये काही तथ्य नसल्याचे दोन्ही नेत्यांनी म्हटले होते.

आज देखील तसेच घडले. आज निलेश लंके हे शरद पवार यांच्या गटात सहभागी होतील अशी बातमी सकाळी समोर आली. आज चार वाजता निलेश लंके हे पुण्यात शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात सहभागी होतील अशी बातमी समोर आली होती.

पण, आजही निलेश लंके हे शरद पवार यांच्या गटात सहभागी झाले नाहीत. सुप्रीमो शरद पवार, खासदार अमोल कोल्हे, जयंत पाटील यांच्या उपस्थितीत निलेश लंके यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन पूर्ण झाले मात्र त्यांचा पक्षप्रवेश झाला नाही. म्हणजे आमदार निलेश लंके यांच्याबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला संभ्रम आजही कायम राहिला.

निलेश लंके लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी शरद पवार गटात जात असावेत, असे स्पष्ट संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. त्याप्रमाणे निलेश लंके आज पुण्यातील ‘शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस’ पक्षाच्या कार्यालयात पोहोचले. मात्र यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक लढविण्याबाबत किंवा शरद पवार गटात प्रवेश करण्याबाबत कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही.

मात्र तुमच्या हातात घड्याळ आहे की तुतारी ? असा प्रश्न विचारला असता निलेश लंके यांनी  “साहेब सांगितल तो आदेश”, असे सूचक विधान केले आहे. पुढे बोलतांना ते असे म्हटलेत की, “मी शरद पवारांच्या विचारधारेबरोबरच आहे. लहानपणापासून शरद पवारांच्या नेतृत्वाचा आणि विचारांचा मी चाहता आहे.

करोना काळात मी शरद पवार यांच्या नावाने कोविड सेंटर सुरू केले होते. ज्या काळात कुटुबांतील लोक एकमेकांना विचारत नव्हते. त्या काळात मी शरद पवार साहेबांच्या नावाने समाजसेवा करत होतो. त्याच काळात मला जे अनुभव आले. त्याआधारावर ‘मी अनुभवलेला कोविड’ हे पुस्तक लिहिले आहे.

त्याचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते व्हावे, अशी माझी इच्छा होती. त्यासाठी मी आज इथे आलो आहे.” एकंदरीत लंके यांच्या पक्षप्रवेशाचा तिढा अजूनही कायमच आहे. यामुळे निलेश लंके हे दादांसोबत आहेत की साहेबांसोबत याबाबत जाणून घेण्यासाठी आणखी काही काळ जाऊ द्यावा लागणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe