Ahmednagar News : नगर दक्षिण व शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवारपासून (१८ एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात मुहूर्त शोधण्यासाठी उमेदवारांची धावाधाव सुरू झाली आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी १६ मार्चपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. नगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी १३ मे रोजी मतदान होत आहे. १८ एप्रिलपासून या निवडणुकीसाठी उमेदवारीअर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करताना आचारसंहितेच्या बंधनामुळे निवडणूक अधिकाऱ्यांच्या दालनात शक्तिप्रदर्शन करण्यावर निर्बंध घातले आहेत. केवळ तीन वाहनांतून उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी यावे लागणार आहे.
या निवडणुकीसाठी दोन्ही मतदारसंघातून उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी मुहूर्त शोधण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, निश्चित केलेल्या दरानुसारच उमेदवारांना दैनंदिन खर्च सादर करावा लागणार आहे. या खर्चाचे स्वतंत्र यंत्रणेमार्फत ऑडिट होणार असल्याचे सांगण्यात आले.