प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेवर पुन्हा एकदा बी टीम शिक्का ! कार्यकर्त्यांना आवाहन करणारे पत्र लिहिले

Ahmednagarlive24 office
Published:
Maharashtra News

Maharashtra News : लोकसभा निवडणुकीत वंचितची लढाई भाजपसोबत आहे. कोणतीही चूक होऊ देऊ नका, असे भावनिक आवाहन करणारे पत्र वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना लिहिले आहे.

महाविकास आघाडीतील शिवसेना (ठाकरे), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) भूमिकेवरही आंबेडकर यांनी नाराजी व्यक्त करत टीका केली आहे.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत खटके उडाल्यानंतर वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी स्वबळाचा नारा दिला. प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेवर पुन्हा एकदा बी टीम शिक्का मारला जात आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करणारे पत्र लिहिले आहे.

कार्यकर्त्यांच्या पाठिंब्याबद्दल तसेच अतूट निष्ठा आणि पक्षासाठी केलेल्या अखंडित कामाबद्दल आभार मानायला पत्र लिहित आहे. येत्या निवडणुकीत आपल्याकडून कोणतीही चूक होऊ देऊ नका. महाराष्ट्रातील ही लढाई केवळ वंचित आणि भाजप यांच्यातच होणार आहे.

महाविकास आघाडीत एकवाक्यता नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाले आहेत. काँग्रेस चाचपडत आहे. काहींनी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांबाबत थेट हायकमांडकडे तक्रार करून उघडपणे बंड करत आहेत. राज्यातील राजकीय स्थिती सध्या उलटसुलट आहे. अशा स्थितीत भाजपला शह देण्यासाठी वंचित संपूर्ण ताकदीने उतरली आहे.

मात्र, महायुती आणि महाविकास आघाडीच्या दावणीला बांधलेल्या प्रसारमाध्यमांच्या बातम्यांवर लक्ष देऊन संयम गमावू नका, असे आवाहन केले आहे. तसेच वंचितने दिलेल्या उमेदवारांबाबत प्रश्न विचारून संसदेत जाण्याची वाट अडवत असल्याची भीती पत्रातून व्यक्त केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe