Panjabrao Dakh News : भारतात लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. राजकीय पक्ष आणि राजकीय नेते निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत. विविध राजकीय पक्षाचे उमेदवार, नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. अशातच, मात्र महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे परभणीचे हवामान अभ्यासक पंजाबराव डख हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबरावं डख हे खासदारकीची निवडणूक लढवणार आहेत. पंजाबराव यांच्या हवामान अंदाजावर राज्यातील शेतकऱ्यांचा मोठा गाढा विश्वास आहे. शेतकरी बांधव जेवढा विश्वास हवामान विभागावर ठेवत नाहीत तेवढा विश्वास त्यांचा पंजाब डख यांच्यावर आहे.
पंजाबरावांचे हवामान अंदाज हे तंतोतंत खरे ठरतात आणि यामुळे आमचे नुकसान कमी होते असा दावा शेतकरी करतात. मात्र हवामानाचा अंदाज सांगणारे पंजाबराव डख आता निवडणुकीच्या आखाड्यात आपले नशीब आजमावणार आहेत.
यामुळे ढग पाहून पाऊस पडेल की नाही हे अचूक सांगणारे पंजाबरावांचे खासदारकीच्या निवडणुकीतील अंदाज खरे ठरणार का ? त्यांना लोकसभा निवडणुकीत विजयी पताका फडकवता येणार का हे पाहण्यासारखे राहणार आहे.
कोणत्या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार
पंजाबरावांनी स्वतः ते लोकसभा निवडणूक लढवणार असे सांगितले आहे. परभणी लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा यावेळी केली आहे. विशेष म्हणजे ते कोणत्याच राजकीय पक्षाकडून तिकीट घेऊन उभे राहणार नाहीत.
तर ते स्वतः अपक्ष म्हणून निवडणुक लढवणार आहेत. दरम्यान पंजाबराव यांनी हा निर्णय घेतल्यानंतर सध्या संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या खासदारकीच्या निवडणुकीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
शेतकऱ्यांमध्ये पंजाबरावांनी घेतलेल्या या निर्णयाच्या मोठ्या चर्चा पाहायला मिळत आहेत. youtube, whatsapp यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हवामानाचे अंदाज सांगणारे, गावोगावी शेतकऱ्यांना शेतकरी मेळाव्यातुन हवामान बदलाची, पावसाची माहिती देणारे डख यांची लोकप्रियता संपूर्ण महाराष्ट्रभर आहे यात शंकाच नाही.
पण आता ते खासदारकीच्या निवडणुकीत उभे राहणार असल्याने मान्सून सुरू होण्यापूर्वीच पंजाबराव चर्चेत आले आहेत. दरम्यान या जागेवर महायुतीकडून महादेव जानकर यांना तिकीट देण्यात आले आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी नुकतेच महायुतीमध्ये समाविष्ट होण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रीय समाज पक्ष NDA मध्ये सामील झाल्यानंतर त्यांना महायुतीने परभणी लोकसभा मतदारसंघातून तिकीट देण्याचा निर्णय घेतलेला आहे.
दरम्यान आता या जागेवरून पंजाबराव डख हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत. यामुळे परभणी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही चांगलीच चर्चेची आणि रोमांचक ठरणार आहे. तथापि या जागेवरून कोण विजयी पताका फडकवते हे निकालाच्या दिवशीच समजू शकणार आहे.