Ahmednagar News : नगर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जिल्ह्याच्या सीमा भागात १२ ठिकाणी नाकाबंदी (चेकपोस्ट) करून तपासणी सुरू केली आहे. अंमली पदार्थ, रोकड, अवैध मद्य, शस्त्रे आदीच्या वाहतुकीला प्रतिबंध करून कारवाई करण्यासाठी २४ तास वाहनांची तपासणी केली जात आहे.
नगर दक्षिण व शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत आचारसंहितेचे पालन करण्यासाठी विविध पथके नियुक्त केली आहेत.
अंमली पदार्थ, मोठी रोकड, अवैध मद्य उत्पादन आणि वाहतूक, शस्त्रे याच्या वाहतूक व तस्करीवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. नाकाबंदी, गस्त व विशेष मोहिम राबवून करवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिले आहेत.
नाकाबंदीसाठी प्रत्येक ठिकाणी एक अधिकारी व तीन कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. वायरलेस संदेश यंत्रणा बसवण्यात आलेली आहे. अधीक्षक ओला, अपर अधीक्षक प्रशांत खैरे, सर्व उपअधीक्षक नाकाबंदी असलेल्या ठिकाणी अचानक भेटी देऊन तपासणी करत आहेत.
नाकाबंदी केलेले जिल्ह्यातील ठिकाणे
कहेटाकळी (शेवगाव), मिडसांगवी (पाथर्डी), साकत नाका (जामखेड), खेड (कर्जत), बेलवंडी फाटा (बेलवंडी), टाकळी ढोकेश्वर (पारनेर), काष्टी (श्रीगोंदा), नाऊर (श्रीरामपूर तालुका), कर्हे घाट (संगमनेर शहर), येसगाव फाटा (कोपरगाव तालुका), प्रवरासंगम (नेवासा) व आळेखिंड (घारगाव).