Radhakrishan Vikhe Patil On Sharad Pawar : येत्या काही दिवसात लोकसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. यामुळे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. दरम्यान याच लोकसभा निवडणुकांपूर्वी अहमदनगरच्या राजकारणात एक मोठी डेव्हलपमेंट पाहायला मिळतं आहे. ती म्हणजे अजितदादा यांच्या गटातील पारनेरचे आमदार निलेश लंके हे लवकरच शरद पवार यांच्या गटात सहभागी होण्याची शक्यता आहे.
याला अजून निलेश लंके तथा शरद पवार यांच्या माध्यमातून दुजोरा मिळालेला नाही. काल निलेश लंके यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर एक पत्रकार परिषद झाली. त्यामध्ये देखील या दोन्ही नेत्यांनी याबाबत कोणतीच स्पष्टोक्ती दिलेली नाही. मात्र निलेश लंके यांनी काल साहेब जे आदेश देतील तो मान्य असेल असे म्हटले आहे.
तथा शरद पवार यांनी लंके यांच्या पाठीशी उभे राहणार असे सांगितले आहे. शिवाय लंके यांच्या गाडीवरील घड्याळ हे चिन्ह दूर होऊन आता त्या जागी तुतारी येऊन विराजमान झाली आहे. एवढेच काय तर कार्यकर्त्यांच्या माध्यमातून निलेश लंके यांचा एक बॅनर लावण्यात आला आहे.
ज्यात शरद पवार यांचा फोटो, तुतारी चिन्ह तसेच निलेश लंके आणि त्यांच्या धर्मपत्नी राणी लंके यांचा एकत्रित फोटो छापण्यात आला असून यामध्ये ‘वस्तादाचा पहिला डाव’ असे म्हटले गेले आहे. या संदर्भात निलेश लंके यांना विचारले असता त्यांनी ‘आगे आगे देखो होता है क्या ?’ असे सूचक वक्तव्य केले आहे.
यावरून निलेश लंके यांचा शरद पवार यांच्या गटातील पक्षप्रवेश जवळपास सुनिश्चित असल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, निलेश लंके आणि पवार यांच्या भेटीवर राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील जहरी टीका केली आहे. राधाकृष्ण विखे पाटील नगर जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले होते.
यावेळी अनेक थोरात समर्थक कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत देखील झाले आहे. विखे पाटील यांनी यावेळी तालुक्यातील विविध गावांमधील 145 कोटींच्या विकास कामांची भूमिपूजन केले आहे. दरम्यान मतदारसंघातील खांबे येथील सभेत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पवार आणि निलेश लंके यांच्या भेटीवर निशाणा साधला आहे.
यावेळी विखे पाटील यांनी आपल्या भाषणात लंके आणि पवार भेटीवर बोलताना असे म्हटले आहे की, “समोर कोण उभे राहिल याचा मी फार विचार करत नाही. पाच वर्षांपूर्वी सुद्धा स्वतःला जाणता राजा म्हणवणाऱ्यांनी हा प्रयोग करून पाहिलाय. त्यावेळी तर आमच्या थोरल्या बंधूंना आमच्या विरोधात भाषण करायला लावली. लोकांचे घर फोडायचा यांचा धंदा आहे. मात्र आज त्यांचच घर फुटलं. परमेश्वराच्या दारात हे फेडावच लागतं.
लोक विखे पाटलांना पाहून नव्हे तर भाजपच्या नेतृत्वाला पाहून मतदान करतात.” यावेळी विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील टीका केली आहे. ते म्हटलेत की, ‘2019 च्या निवडणुकीत जनतेने भाजप-शिवसेना युतीला मतदान केलं. पण, उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले. विश्वासघाताच राजकारण केलं.
मात्र नियतीला काही औरच मान्य होतं त्यामुळे आज सत्ता आपली आली. यावेळी महसूल मंत्र्यांनी थोरात यांच्यावरही कटाक्ष साधला. ‘काही लोक आम्ही केलेल्या कामाचं भूमिपूजन आणि उद्घाटन करतात, पण जनतेला सगळं माहिती आहे’, असं म्हणत त्यांनी थोरात यांना टोला लगावला आहे.
याशिवाय त्यांनी इथले काही नेते संगमनेरचे मॉडेल राज्याने घ्यावे असे म्हणतात. पण, संगमनेर तालुक्यात 50 टँकर चालू आहेत, मग हे मॉडेल राज्याने घ्यायचे का ? या तालुक्यात रोजगारासाठी कधी मेळावा झाला आहे का ? असा सवाल करत थोरात यांच्यावर कटाक्ष साधला आहे.