Raj Thackeray Vs Sadashiv Lokhande : महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी घडामोड समोर येत आहे. खरेतर लोकसभेचा बिगुल वाजला आहे. निवडणूक आयोगाने मतदानाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. देशात आचारसंहिता लागू झाली आहे. आजपासून थेट एका महिन्यात म्हणजे 19 एप्रिलला पहिल्या चरणाची मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आहे. यंदा होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी सात टप्प्यात मतदान होणार असून आपल्या महाराष्ट्रात 5 टप्प्यात मतदान होईल. निवडणुकीचा निकाल 4 जूनला जाहीर होणार आहे.
साहजिकच यामुळे सध्या संपूर्ण देशभरात राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. राजकीय पक्ष आणि राजकीय नेते आता उमेदवार फायनल करून त्यांची नावे जाहीर करण्याच्या तयारीत आहेत. काही राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या याद्या जाहीरही केल्या आहेत. मात्र अजूनही कोणत्याच पक्षाने संपूर्ण उमेदवारांच्या याद्या जाहीर केलेल्या नाहीत. अशातच महाराष्ट्रात एक नवीन ट्विस्ट समोर येत आहे. तो म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता महायुतीत समाविष्ट होण्याची शक्यता आहे.
राज ठाकरे यांना भाजपाच्या पक्षश्रेष्ठीकडून दिल्लीत बोलावणं आलं होतं. यानुसार राज ठाकरे यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी राजपुत्र अमित ठाकरे देखील सोबत होते. दरम्यान ठाकरे आणि शहा यांच्यात मनसेचा महायुतीत समावेश करून घेणे आणि जागा वाटपावरून अर्धा तास बंद दाराआडचर्चा झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत मनसेला दोन जागा देण्याचे मान्य करण्यात आले आहे. दक्षिण मुंबई आणि नाशिक किंवा शिर्डी पैकी एक जागा मनसेला दिली जाऊ शकते अशा चर्चा सध्या सुरु आहेत.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, अहमदनगर जिल्ह्यात लोकसभेच्या दोन जागा आहेत. एक जागा नगर दक्षिणची आहे ज्याच्यावर महायुतीकडून भारतीय जनता पक्षाचा उमेदवार फायनल झाला आहे. नगर दक्षिण मधून पुन्हा एकदा डॉक्टर सुजय विखे पाटील यांना उमेदवारी मिळालेली आहे. दुसरीकडे शिर्डीची जागा ही एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे जाते. सध्या या लोकसभा मतदारसंघाचे सदाशिव लोखंडे हे प्रतिनिधित्व करत आहेत. मात्र मनसे महायुतीमध्ये आल्यानंतर सदाशिव लोखंडे यांचा पत्ता कट होईल आणि त्या जागी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार उभा राहिल अशा चर्चा आहेत.
यामुळे आता खरंच शिर्डी मधून सदाशिव लोखंडे यांना डच्चू मिळतो का ? हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे. दरम्यान, शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत चर्चा करून येथे एक दोन दिवसात महायुतीत समाविष्ट होण्याची प्रक्रिया पूर्ण करावी असे सांगितले असल्याचे सूत्रांकडून समजत आहे. यामुळे महायुतीत नवीन पाव्हणा येणार हे जवळपास निश्चित झाल्याचे स्पष्ट होतंय. आता आपण मनसेला ज्या 2 जागा दिल्या जाऊ शकतात, त्यांच्याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेऊया.
दक्षिण मुंबई : महाविकास आघाडी कडून दक्षिण मुंबईतून उबाठा शिवसेनेच्या अरविंद सावंत यांना उमेदवारी मिळणार आहे. ते तिसऱ्यांदा या जागेवर उभे राहणार आहेत. दरम्यान महायुतीकडून ही जागा आता मनसेला जाईल आणि येथून अमित ठाकरे किंवा बाळा नांदगावकर यांना तिकीट दिले जाऊ शकते. लालबाग परळ या भागात नांदगावकर यांचा मोठा प्रभाव आहे. या जागेवर भाजपाचा देखील चांगला प्रभाव आहे. दरम्यान, आता शिवसेनेत उभी फूट पडली आहे यामुळे काही मत एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्याकडे पाहूनही महायुतीच्या उमेदवाराला मिळू शकतात.
परिणामी या ठिकाणाहुन मनसेचा उमेदवार निवडून येईल असे भाजपला वाटतं आहे. पण, भारतीय जनता पक्षाने या जागेवरून तरुण चेहरा आणि सुशिक्षित उमेदवार म्हणून अमित ठाकरे यांना पसंती दाखवली असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे ही जागा मनसे महायुतीत समाविष्ट झाल्यानंतर त्यांनाच मिळेल. पण या जागेवर ठाकरे घराण्यातील दुसरी व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का हे पाहणे मोठे उत्सुकतेचे राहणार आहे.
नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नाशिक महापालिकेत सत्ता भोगली आहे. महापालिकेवर मनसेचा महापौर होता. मनसेने महापालिकेवर सत्ता असताना काही कौतुकास्पद कामही केलीत. 2009 मध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघात वसंत मोरे, नितीन भोसले आणि उत्तमराव ढिकले हे तीन मनसे आमदार निवडून आले होते. अर्थातच या जागेवर मनसेचा चांगला प्रभाव आहे. या जागेवरून सध्या एकनाथ शिंदे यांच्या गटातील हेमंत गोडसे हे खासदार आहेत. तथापि या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा या दोघांनी दावा केला आहे. मात्र मनसे महायुती समाविष्ट झाल्यानंतर मनसेलाची जागा मिळणार असे बोलले जात आहे.
राज ठाकरे सदाशिव लोखंडे यांचा गेम करणार ?
महायुती मध्ये समाविष्ट झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला दक्षिण मुंबई आणि नाशिक किंवा शिर्डी पैकी एक जागा अशा दोन जागा देण्याचा निर्णय झालेला असल्याची माहिती समोर येत आहे. आपण दक्षिण मुंबई आणि नाशिक या दोन जागेचे विश्लेषण देखील पाहिले. दरम्यान आता आपण शिर्डीबाबत थोडक्यात माहिती जाणून घेऊया. ही जागा एकनाथ शिंदे यांच्या गटाला जाण्याची शक्यता आहे. विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना पुन्हा एकदा एकनाथ शिंदे गट उमेदवारी देणार अशा चर्चा आहेत.
पण, सदाशिव लोखंडे यांचा मतदारसंघात खूपच कमी जनसंपर्क असल्याचे सांगितले जाते. जर अमित ठाकरे यांना दक्षिण मुंबई मधून तिकीट दिले गेले तर शिर्डीतून मनसेचे बाळा नांदगावकर हे उभे राहणार अशी चर्चा आहे. त्यामुळे जर महायुतीमध्ये राजपर्व सुरू झाले तर एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या 2 विद्यमान खासदारांची नावे कट होऊ शकतात. यामुळे आता राज ठाकरे हे सदाशिव लोखंडे यांचा पत्ता कट करतील का आणि हो, तर त्या जागेवरून कोणाला उमेदवारी देतील हे विशेष पाहण्यासारखे ठरणार आहे.