जिल्हाभरातील विरोधक एकत्र येऊनही भाजप वरिष्ठांचा सुजय विखे पाटलांवर विश्वास कायम ! ‘ह्या’ कारणामुळे मिळाली उमेदवारी…

Tejas B Shelar
Published:
Sujay Vikhe News

Sujay Vikhe News : 17 व्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 ला संपणार आहे. निवडणूक आयोग लवकरच निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार आहे. यामुळे आगामी लोकसभा निवडणुकांसाठी आता राजकीय पक्षांच्या माध्यमातून आपल्या अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर केली जात आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी भाजपाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. मात्र यामध्ये महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचे नाव नव्हते हे विशेष. राज्यातील महायुतीमध्ये जागा वाटपावरून गोंधळ सुरू असल्याने पहिल्या यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांची नावे नव्हती.

आज मात्र भारतीय जनता पक्षाने आपल्या अधिकृत उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असून यामध्ये राज्यातील 20 उमेदवारांची नावे आहेत. यात नगर दक्षिणची धुरा पुन्हा भाजपाने डॉक्टर सुजय विखे यांच्याकडे सोपवली आहे. विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे यांना पुन्हा एकदा आगामी लोकसभेसाठी उमेदवारी मिळाली आहे. खरेतर गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात डॉक्टर सुजय विखे पाटील यांना पक्षांतर्गत विरोध जड जाणार अन त्यांना आगामी निवडणुकीसाठी तिकीट नाकारले जाऊ शकते अशा चर्चा सुरू होत्या.

याचे कारण म्हणजे भाजपाचे विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांनी नगर दक्षिणमधून उभे राहण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांनी विखे यांच्या विरोधात मोर्चा खोलला होता. दुसरीकडे नगर मधील भाजपाचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी देखील सुजय विखे आणि त्यांचे वडील आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात आवाज बुलंद केला होता. विवेक कोल्हे यांनी तर नाव न घेता विखे यांना नगर जिल्ह्याला लागलेला कॅन्सर असे संबोधले होते. तसेच हा कॅन्सर डॉक्टर निलेश लंके दूर करतील असे म्हटले होते.

स्वतःच्या पक्षातून तर विखे यांचा विरोध केला जात होता मात्र महायुतीमधील मित्र पक्षांमधील काही नेत्यांनी देखील विखे यांच्या विरोधात भूमिका घेतलेली होती. डॉक्टर निलेश लंके हे यात आघाडीवर होते. निलेश लंके यांनी तर नगर दक्षिणमधून निवडणूक लढवण्याचे संकेतच दिलेलेच आहेत. एकंदरीत नगरमध्ये विखे विरुद्ध सारे असे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे सुजय विखे यांना उमेदवारी देताना केंद्रीय नेतृत्व यादेखील घडामोडी विचारात घेईल असे बोलले जात होते.

शिवाय भाजपाने आपल्या पहिल्या यादीत अनेक केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले होते. हेच कारण होते की, गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात डॉक्टर सुजय विखे यांना भाजपाकडून उमेदवारी मिळणार नसल्याच्या चर्चा सुरू होत्या. पण, काही नगर जिल्ह्याच्या राजकारणातील जाणकार लोकांनी विखे पिता पुत्र यांचे भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाशी असलेले घनिष्ठ संबंध पाहता ते पुन्हा एकदा तिकीट खेचून आणतील असा दावा केला होता.

गेल्या काही वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत विखे पाटील यांची जवळीक वाढलेली आहे. भाजपाचे केंद्रीय नेतृत्व विखे यांच्याकडे राज्यातील मराठा समाजाचे नेतृत्व म्हणून पाहते. हेच कारण आहे की, पक्षांतर्गत विरोध असूनही सुजय विखे यांच्यावर पुन्हा एकदा केंद्रीय नेतृत्वाने विश्वास दाखवला आहे. भाजपाने यावेळी अबकी बार 400 पारचा संकल्प घेतला आहे.

हेच कारण आहे की, भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने विद्यमान खासदारांचा स्ट्राईकरेट चेक करून ज्यांनी चांगली कामगिरी केली आहे त्यांनाच तिकीट देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भाजपच्या पहिल्या यादीत आणि दुसऱ्या यादीत देखील अनेक दिग्गज विद्यमान खासदारांना तिकीट नाकारले गेले आहे. पण, विखे यांनी त्यांच्या मतदारसंघात केलेले काम आणि त्यांची नगर जिल्ह्यात असणारी एक स्पेशल यंत्रणा यामुळे त्यांच्यावर विश्वास दाखवण्यात आला आहे.

खरेतर भाजपाने अबकी बार 400 पार हा नारा दिला असून यामध्ये 370 जागा भाजपाला स्वतःच्या बळावर जिंकायच्या आहेत. त्यामुळे उमेदवार ठरवताना भाजपाने कोणतीच रिस्क घेतलेली नाही. जे उमेदवार निवडून येऊ शकतात त्यांनाच तिकीट देण्यात आले आहे. विखे यांचे नगर दक्षिणसह संपूर्ण नगर जिल्ह्यात आणि राज्यात एक वेगळे स्थान आहे. निवडणुकीमध्ये विखे नेहमीच मोठी यंत्रणा वापरत असतात.

नुकत्याच काही दिवसांपूर्वी त्यांनी नगर दक्षिण मतदार संघामध्ये चणाडाळ वाटप आणि साखर वाटपाच्या माध्यमातून मत पेरणीचा कार्यक्रम देखील उरकला आहे. म्हणजेच जेव्हा लोकसभेची तयारी देखील झालेली नव्हती, जेव्हा सुजय विखे यांचे तिकीट कापले जाईल अशा चर्चा मतदारसंघात होत्या त्यावेळी सुजय विखे यांनी साखर पेरणी थ्रो मत पेरणीला सुरवात केली होती. तसेच गेल्या काही दिवसांपासून सुजय विखे हे सांस्कृतिक कार्यक्रम देखील घेत आहेत.

त्यांची निवडणूक यंत्रणा गेल्या कित्येक दिवसांपासून आगामी निवडणुकीची तयारी करत आहे. यामुळे जिल्ह्यात कोणत्याही चर्चा सुरू असल्या तरीदेखील विखे पिता-पुत्र यांच्यावर केंद्रीय नेतृत्वाचा विश्वास कायम असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. पण, भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाचा विश्वास आता डॉक्टर सुजय विखे आगामी निवडणुकीत कायम ठेवतात का आणि नगरदक्षिणमधून पुन्हा एकदा विजयी पताका फडकवतात का ? हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe