Sujay Vikhe Patil News : नुकत्याच काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात अहमदनगर जिल्ह्यातील नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराचा देखील समावेश आहे.
यावेळी देखील भारतीय जनता पक्षाने डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यावर विश्वास दाखवला आहे. विद्यमान खासदार महोदयांना पुन्हा एकदा नगर दक्षिणचा गड लढवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या दृष्टीने सुजय विखे पाटील यांनी तयारी देखील सुरू केली आहे.
खरंतर ही तयारी आजच सुरू झाली असं म्हणता येणार नाही. कारण की जेव्हा निवडणुकांच्या तारखाही जाहीर झाल्या नव्हत्या तेव्हा सुजय विखे यांनी आपल्या मतदारसंघात चणाडाळ आणि साखर वाटपाच्या माध्यमातून मत पेरणीचा कार्यक्रम सुसाट चालवला होता.
त्यानंतर त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचा धडाका लावला. उमेदवारी मिळणार की नाही याबाबत साशंकता उपस्थित होत असताना त्यांनी मै हु डॉन या गाण्यावर चांगलीच मैफिल गाजवली. आता तर त्यांना अधिकृतरित्या पक्षाने उमेदवारी दिली आहे. यामुळे ते आधीपेक्षा जोमाने कामाला लागले आहेत. त्यांनी प्रचाराला देखील सुरुवात केली आहे.
महायुती मधील इतर मित्रपक्ष देखील प्रचाराच्या कामाला लागले आहेत. दरम्यान, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती मध्ये समाविष्ट असलेल्या शिवसेना शिंदे गटाचा नुकताच मेळावा पार पडला आहे. या मेळाव्यातून सुजय विखे पाटील यांनी महाविकास आघाडीला जोरदार टोला लगावला आहे.
खरंतर महायुतीचा उमेदवार सुजय विखे पाटील हे फिक्स झाले आहेत. पण, महाविकास आघाडीकडून या जागेसाठी अजूनही उमेदवार जाहीर झालेला नाही. यावरून सुजय विखे पाटील यांनी महाविकास आघाडीवर बोचरी टीका केली आहे.
शिवसेनेच्या मेळाव्यात बोलताना सुजय विखे पाटील यांनी असे म्हटले की, ‘जिल्ह्यातील नागरिकांनी विखे कुटुंबातील चौथ्या पीडिला सत्तेत बसवले आहे. आमचे काहीतरी योगदान असेल म्हणूनच नागरिकांनी आम्हाला साथ दिलीय. एखाद्या व्यक्तीला माझ्याबद्दल द्वेष असेल तर हरकत नाही, मात्र ही निवडणूक महायुतीची निवडणूक आहे.
अहमदनगरला भाजपचा उमेदवार मी फिक्स आहे. मात्र समोरचा उमेदवार अजूनही ठरेना.’ महाविकास आघाडीचा उमेदवार अजून फिक्स होत नसल्याने विखे पाटील यांनीही टीका केली आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडीकडून नगर दक्षिण साठी निलेश लंके यांचे नाव जवळपास फायनल झाल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. निलेश लंके हे अजितदादा यांची साथ सोडतील, ते पुन्हा एकदा मोठ्या साहेबांसोबत अर्थात शरद पवार यांच्या गटात जातील आणि हाती तुतारी घेऊन सुजय विखे यांना आव्हान देतील अशा चर्चा आहेत.
विशेष बाब अशी की शनिवारी निलेश लंके यांनी महाविकास आघाडीच्या बैठकीला हजेरी देखील लावली आहे. यावरून शरद पवार यांच्या गटात पक्षप्रवेशाच्या आता फक्त चर्चा राहिलेल्या नाहीत. तर आता फक्त पक्षप्रवेशाची औपचारिकता बाकी आहे. तथापि निलेश लंके यांना महाविकास आघाडी कडून या जागेवरून तिकीट मिळणार का हे पाहण्यासारखे राहणार आहे.