विद्यमान खा. सुजय विखे पाटील यांनी खरंच तुतारीला मत देण्यास सांगितले का ? लंके समर्थकांकडून चुकीचा व्हिडिओ व्हायरल

Sujay Vikhe Patil News

Sujay Vikhe Patil News : सध्या अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणूक साठी महायुतीकडून आणि महाविकास आघाडीकडून जय्यत तयारी सुरू झाली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात केली आहे. लंके हे सध्या संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आहेत. दुसरीकडे महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी देखील प्रचाराला सुरुवात केली आहे.

अशातच मात्र सोशल मीडियामध्ये सध्या खा. सुजय विखे पाटील यांचा एक व्हिडिओ वेगाने व्हायरल केला जात आहे. व्हिडिओ लंके समर्थकांकडून व्हायरल होत असून यामध्ये सुजय विखे पाटील यांनी तुतारीला मत देण्यास सांगितले असल्याचे म्हटले जात आहे.

त्यामुळे सध्या संपूर्ण नगरभर या व्हिडिओची चर्चा पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत अहिल्यानगर मध्ये सध्या वेगाने व्हायरल होत असणाऱ्या व्हिडिओमध्ये अखेर खासदार सुजय विखे पाटील यांनी काय म्हटले आहे, त्यांनी खरच तुतारीला मत देण्यासं सांगितले आहे का ? हे आता आपण पाहणार आहोत.

खासदार सुजय विखे यांनी काय म्हटले आहे ?

खासदार सुजय विखे पाटील यांनी गेल्या काही दिवसांपासून प्रचाराला सुरुवात केली आहे. प्रचाराच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी बूथ कमिटी मेळावा आयोजित केला जात आहे. शेवगाव विधानसभा मतदारसंघात देखील असाच एक मेळावा संपन्न झाला आहे. या मेळाव्याला शेवगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मोनिकाताई राजळे, भाजपा सरचिटणीस अरुण मुंडे असे विविध भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

या मेळाव्यात सुजय विखे पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केले आहे. यामध्ये खासदार महोदय यांनी, ‘भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून समाजात वावरत असताना आपण काय बोलतो याला फार महत्त्व आहे.

तुम्हाला याची जाणीव नसेल पण आपण जेवढ्या ताकतीने आपल्या नेत्याची बाजू मांडू, पंतप्रधान नरेंद्र मोदींची बाजू मांडू. आता प्रत्येकालाच सगळे मान्य आहेत का ? नाही. काही लोकांना सुजय विखे पाटील मान्य नसतील तर त्यांना मोदींचे नाव सांगा. काही लोकांना त्यांची अडचण असेल तर त्यांना माझं नाव सांगा.

दोघांची अडचण असेल तर ताईंचे (आमदार मोनिकाताई राजळे) यांचे नाव सांगा. आमची तिघांची अडचण असेल तर अरुण मुंडे (भाजपा सरचिटणीस) यांचे नाव सांगा. आमच्या चौघांची अडचण असेल तर एखाद्या दुसऱ्याचं नाव सांगा. आमच्या सगळ्यांची अडचण असेल तर मग तुतारी वाजवून टाका,’ असे म्हटले आहे.

एकंदरीत सुजय विखे पाटील यांनी या मेळाव्याला उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधताना आमच्या सगळ्यांचीच अडचण असेल तर तुतारीला मत द्या अशी उपरोधिक टिप्पणी केली आहे. दरम्यान सुजय विखे पाटील यांचा हाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

निलेश लंके यांच्या सभेतून नागरिकांचा काढता पाय

दुसरीकडे पारनेर येथील सुपा येथे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके याच्या सभेचे आयोजन झाले होते. मात्र या जनसंवाद यात्रेतील सभेकडे नागरिकांनी पाठ फिरवली. लंके स्वतः पारनेरचे आमदार राहिले आहेत. लोकसभा लढवण्यासाठी त्यांनी पारनेरच्या आमदारकीचा नुकताच राजीनामा दिला आहे. मात्र त्यांच्याच विधानसभा मतदारसंघात आयोजित सभेला नागरिकांनी प्रतिसाद दाखवला नाही.

विशेष म्हणजे सभेला जे नागरिक उपस्थित होते ते देखील सभा अर्ध्यावर सोडून माघारी परतू लागले होते. यामुळे स्वतः निलेश लंके यांना उपस्थित लोकांना थांबवण्यासाठी विनंती करावी लागली. यामुळे सध्या सोशल मीडियावर निलेश लंके यांच्या पारनेरच्या सभेचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये निलेश लंके हे स्वतः उपस्थित नागरिकांना थांबण्यासाठी विनंती करत असल्याचे दिसत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe