Ahmednagar Politics : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात ‘देश के लिये’ ही निवडणूक महत्त्वाची असल्याचे चित्र उभे करण्याचा प्रयत्न सुरुवातीपासून केला गेला. अहमदनगरची निवडणूक ‘गावकी भावकीत’च अडकल्याचे आत्तापर्यंत झालेल्या प्रचार सभेतील वक्तव्यावरून दिसत आहे.
दरम्यान आता त्याला खा. सुजय विखे यांच्याकडून देशपातळीवर नेण्याचा प्रयत्न होताना दिसतोय. मोदींच्या सभेतही देशपातळीवरीलच मुद्दे प्रामुख्याने समोर आले. यंदाच्या हंगामात आरोपांच्या धुरळ्यासोबतच भावनांचा कल्लोळ अधिक दिसून येत आहे.
एकीकडे खा. सुजय विखे यांच्या पाठीशी घराण्याचा दरारा, संस्था-संघटनांचे विस्तृत जाळे, कार्य़कर्त्यांची फळी, सत्तेचे भक्कम पाठबळ, कॉर्पोरेट मॅनेजमेंट आदी गोष्टी आहेत. वजनदार नेते देखील सुजय विखे यांच्या सोबत आहेत. उड्डाण पूल असेल की विविध रस्ते, एमआयडीसी असेल आदी महत्वाची कामे त्यांनी केलीत.
तसेच केंद्रात मोदींची सत्ता येईल म्हणून आपला खासदारही भाजपचाच हवा अशी मानणारी देखील एक फळी ही देखील त्यांची जमेची बाजू. तर दुसरीकडे साधासुधा, कधीही फोन उचलणारा व लगेच कार्यक्रमांना येणारा आपला माणूस अशी लंके यांची छबी गावोगावी बनलीय.
तसेच कोरोनाच्या कालावधीत केलेली कामे वेगळीच. कांदा निर्यात, दुधाचे घसरते भाव या गोष्टी देखील लंके यांच्या पथ्यावर पडताना दिसत आहेत. मोदी फॅक्टर, शहरी व निमशहरी नागरिक हे विखेंच्या बाजूने सध्या दिसत आहेत तर विस्तृत ग्रामीण भागातल्या गावांतली हवा लंकेंसाठी समर्थनार्थ ठरत आहे.
नेत्यांची भूमिका व नाराजांची सक्रियता महत्वाची
माजी मंत्री बाळासाहेब थोरात, प्राजक्त तनपुरे, रोहित पवार, प्रताप ढाकणे हे नेते उघडपणे लंके यांचा सध्यातरी प्रचार करताना दिसत आहेत. तर अनेक कारखानदार महायुतीसोबत आहेत. भाजपमधी नाराज नेत्यांची फळी सध्या आमचे सगळे मिटले आहे असे म्हणत विखे यांच्या सोबतीने फिरत आहे.
त्यामुळे आता अंतिम क्षणी मतदानाच्या वेळी लंके यांच्या सोबत असणाऱ्या नेत्यांची भूमिका व भाजप नाराजांची भूमिका काय असेल हे देखील निकालासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.
अंतिम निकालाकडे लक्ष
अंतिम क्षणी चमत्काराच्या तंत्रात विखे परिवार तरबेज आहे हे बहुतांश लोक म्हणतात, तर दुसरीकडे लंकेंची जायंट किलर होण्याची मनीषा जोरावर आहे. त्यामुळे वातावरण इतके घासून आहे की, प्रत्यक्ष मतदानाचा अंक आणि त्याहूनही निकालाचा क्लायमॅक्स हा दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांसाठी धक्कादायक असेल.
अहमदनगरमधील एकूण मतदार – ३६,३५,३६६
महिला – १७,४९,८५८
पुरुष – १८,८५,३१५