नगर दक्षिणेत विखे की लंके ?

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : लोकसभेच्या निवडणुकीचा चौथा टप्पा नुकताच पार पडला असून, या निवडणुकीमध्ये अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्ष व महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे बाजी मारतात, की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) महाविकास आघाडीचे निलेश लंके हे बाजी मारतात,

याबाबत शेवगाव तालुक्यात दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून दावे -प्रतिदावे केले जात आहेत. नुकत्याच पार पडलेल्या या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच २५ उमेदवारांमुळे २ इव्हीएम मशिनद्वारे आपला पसंतीचा उमेदवार शोधताना अशिक्षित मतदारांना कसरत करावी लागली. उन्हाची भयंकर तीव्रता असताना ग्रामीण भागातील असंख्य मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करण्यासाठी पुढाकार घेतला असल्याचे पहावयास मिळाले.

काही किरकोळ वाद वगळता कुठेही अनुचित प्रकार घडला नसून सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली आहे. मात्र, आता उत्सुकता आहे ती ४ जून रोजी लागणाऱ्या निकालाची. कार्यकर्त्यांमध्ये जोरदार चर्चा कारण विखे व लंके यांच्या समर्थक कार्यकर्त्यांकडून आपलाच उमेदवार विजयी होणार, अशी जोरदार चर्चा होताना ऐकावयास मिळत आहे. महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्यासाठी मोनिकाताई राजळे व चंद्रशेखर घुले पा. या आजी-माजी आमदारांनी अनेक गावात दौरा केला असून,

विखे यांच्या विषयी काही प्रमाणात नाराजी दिसून आली असली तरी महायुतीचा उमेदवार निवडून द्या, असे आवाहन कार्यकर्त्यांना त्यांनी केले होते. तर महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) चे प्रदेश सरचिटणीस अॅड. प्रतापराव ढाकणे यांनीही आपली ताकद लावली.

२२२ शेवगाव – पाथर्डी विधानसभा मतदारसंघात ३६५ केंद्रांमधून निवडणूक प्रक्रिया पार पडली असून, ३ लाख ६१ हजार १९४ मतदारांपैकी २ लाख २६ हजार ६१९ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून, एकूण सरासरी ६२.७४ टक्के मतदान झाल्याची माहिती तहसील कार्यालयातून समजली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe