Sharad Pawar On Nilesh Lanke : सध्या आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आगामी निवडणुकीत कोणत्या उमेदवारांना संधी दिली पाहिजे याबाबत राजकीय पक्षांमध्ये जोरदार मंथन सुरु आहे. काँग्रेस आणि भाजपाने तर आपल्या उमेदवारांची अधिकृत यादी देखील जारी केली आहे. या दोन्ही पक्षांनी आपली पहिली यादी जाहीर केली आहे.
मात्र यामध्ये महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचे नाव नाहीये. यावरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून गदारोळ सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र असे असले तरी इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. अशीच तयारी अहमदनगर जिल्ह्यातील नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळत आहे.
या जागेवर विद्यमान खासदार सुजय विखे यांनी पुन्हा उमेदवारीसाठी तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे अजितदादा यांच्या गटात समाविष्ट पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी देखील या जागेवर निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. मात्र महायुतीमधून निलेश लंके यांना तिकीट मिळू शकणार नाही, असे चित्र असल्याने निलेश लंके शरद पवार यांच्या गटात समाविष्ट होणार अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत.
सुजय विखे पाटील आणि निलेश लंके यांच्यात लोकसभेची लढत रंगणार असे म्हटले जात आहे. शरद पवार यांच्या गटातील खासदार अमोल कोल्हे यांनी नगर शहरात लंके प्रतिष्ठान आयोजित शिवपुत्र संभाजी महानाट्यात तर निलेश लंके यांना हाती तुतारी घेऊन आगामी लोकसभेसाठी रिंगणात उतरण्याची ऑफर देण्यात आली होती.
लोकनेत्याने पुन्हा एकदा परतीचा मार्ग धरावा आणि आणि नगर दक्षिणमधून तुतारी फुंकावी असं म्हणत कोल्हे यांनी निलेश लंके यांना शरद पवार यांच्या गटाकडून नगर दक्षिण मधून लोकसभा लढवण्याची ऑफर देऊ केली होती.
तेव्हापासून निलेश लंके हे शरद पवार यांच्या गटात जाणारच अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. मात्र, आज सकाळी या चर्चेने सर्वाधिक वेग घेतला. प्रसारमाध्यमांमध्ये निलेश लंके पुन्हा एकदा शरद पवार यांच्या गटात सामील होणार अशा चर्चा पाहायला मिळत होत्या.
आगामी लोकसभेच्या पूर्वीच निलेश लंके यांची ही गुगली अजित दादांसाठी डोकेदुखी ठरणार असे म्हटले जात होते. दरम्यान शरद पवार यांच्या गटात सामील झाल्यानंतर निलेश लंके यांना नगर दक्षिणमधून उमेदवारी मिळणार असा देखील दावा होत होता.
मात्र या साऱ्या चर्चा तथ्यहीन असल्याचे खुद्द शरद पवार यांनी म्हटले आहे. सकाळी त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती, यावेळी सुप्रीमो शरद पवार यांनी अहमदनगरमधील पारनेर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेत तथ्य नसल्याचे म्हटले आहे.
स्वत: शरद पवार यांनीच अस वक्तव्य केले असल्याने गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या निलेश लंके यांच्या घरवासीच्या चर्चा आता थांबणार आहेत. यावेळी पवार यांनी असे अनेक लोक आहेत जें की आमच्या पक्षात येण्यास इच्छूक आहेत, अनेकांची चर्चा आहे. मात्र, लंके यांच्याबाबतीत यात काहीही तथ्य नाही.
आज सकाळी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत निलेश लंके हे पुन्हा घर वापसी करणार ही चर्चा शरद पवार यांनी फेटाळून लावली आहे. आज सकाळपासून जोरदार सुरू असलेली ही चर्चा शरद पवार यांनी एका वाक्यात फेटाळून लावली आणि ही चर्चा मला तुमच्याकडूनच कळत आहे, असेही म्हटले आहे.