चीनच्या चांगई-५ यानाने आणलेल्या नमुन्यांच्या अभ्यासानंतर, चंद्रावरील मातीत आढळला पाण्याचा अंश !

चंद्रावरून आणलेल्या मातीच्या नमुन्यांचा अभ्यास केला असता चिनी शास्त्रज्ञांना त्यामध्ये पाण्याचा अंश आढळला आहे. चंद्रावर बर्फाच्या स्वरुपात पाणी असल्याचे दावे यापूर्वीही करण्यात आले असून चीनच्या संशोधनामुळे या दाव्यांना दुजोरा मिळाला आहे.

चीनने आपल्या चांगई-५ नामक चांद्रमोहिमेद्वारे पृथ्वीच्या या उपग्रहावर २३ नोव्हेंबर २०२० रोजी एक यान पाठवले होते. १ डिसेंबर रोजी हे यान चंद्रावर पोहोचले. या यानाने तेथील मातीचे नमुने गोळा केले आणि १६ डिसेंबर रोजी ते पृथ्वीवर परतले.

या नमुन्यांचा चिनी शास्त्रज्ञ अभ्यास करत आहेत. आतापर्यंत केलेल्या अभ्यासानुसार चंद्रावरील मातीत पाण्याच्या ६ अणूंसोबत अमोनियम हे खनिज हायड्रेटेड स्वरुपात आढळले आहे. याशिवाय या नमुन्यांमध्ये १ हजाराहून अधिक खनिजे आढळली आहेत.

यांपैकी एक खनिज पारदर्शक स्फटिकाप्रमाणे आहे. या खनिजाचे (यूएलएम-१) असे नामकरण करण्यात आले आहे. या खनिजात पाण्याचे अणू आढळल्याचे चिनी संशोधकांनी सांगितले.

चंद्रावर पाणी धरून ठेवणारी खनिजे मोठ्या प्रमाणात असल्याचे सिद्ध करण्यासाठी तेथील मातीचे नमुने अधिक प्रमाणात आणण्याची आवश्यकता आहे. चांगई-५ मोहिमेद्वारे १,७३१ ग्रॅम माती पृथ्वीवर आणण्यात आली होती.

गेल्या महिन्यात चीनचे चांगई-६ चांद्रयान चंद्रावरून सुमारे दोन किलो माती घेऊन परतले आहे. या नमुन्यांच्या अभ्यासातून चंद्रावरील पाण्याच्या उपलब्धतेबाबत अधिक माहिती मिळू शकेल.

भारताने २००९ साली राबवलेली आपली पहिली चांद्रमोहीम ‘चांद्रयान-१’ने पृथ्वीच्या या उपग्रहावरील खनिजांमध्ये ऑक्सिजन आणि हायड्रोजनचे अणू असल्याचे सांगितले होते.

२०२० साली अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने चंद्रावर खनिजांच्या स्वरुपात पाणी असल्याची घोषणा केली होती. मात्र चंद्रावरील मातीचे नमुने उपलब्ध नसल्याने या दाव्यांना ठोस बळ मिळत नव्हते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe