पुढील सहा वर्षात होणार तब्बल दहा सूर्यग्रहणे, कुठे आणि कधी ते जाणून घ्या !

सूर्यग्रहण ही अनेक खगोलीय घटनांपैकी एक अनोखी घटना आहे. सूर्यग्रहणाचे विलक्षण दृश्य पाहण्यासाठी जगभरातील लोक आतुरतेने वाट पाहत असतात. परंतु भारतीयांना मात्र सूर्यग्रहण पाहण्यासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

कारण यापुढील सहा वर्षांच्या काळात होणारे एकही सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. पुढील सहा वर्षांच्या काळात म्हणजेच २०३० पर्यंत वेगवेगळ्या प्रकारची १० सूर्यग्रहण होणार आहेत. मात्र ती भारतात दिसणार नाहीत. भारतात २६ डिसेंबर २०१९ रोजी दिसलेले शेवटचे सूर्यग्रहण होते. त्यानंतर आता थेट २१ मे २०३१ रोजी होणारे सूर्यग्रहण भारतातून दिसणार असल्याचे खगोल शास्त्रज्ञांनी सांगितले आहे.

सूर्यग्रहणाच्या वेळी चंद्र, पृथ्वी आणि सूर्य यांच्यामधून जात असताना सूर्यापासून पृथ्वीवर येणारा प्रकाश थांबवत असल्याने सूर्यप्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचू शकत नाही. यावेळी अंतराळातून पाहिले तर पृथ्वीवर मोठी सावली दिसते. अशाप्रकारचे २०२४ मध्ये दोन सूर्यग्रहण होणार आहेत. यापैकी एक संपूर्ण सूर्यग्रहण ८ एप्रिल रोजी झाले असून ते मेक्सिको, युनायटेड स्टेट्स आणि कॅनडामध्ये दिसले होते.

आता पुढील काही महिन्यांत दुसरे सूर्यग्रहण देखील दिसणार आहे, जे कंकणाकृती सूर्यग्रहण असेल. कंकणाकृती सूर्यग्रहणामध्ये चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकत नाही. तर या ग्रहण काळात सूर्याचे केंद्र झाकलेले असते आणि कडा स्पष्टपणे दिसत असतात. त्यामुळे आकाशात आगीचे वलय दिसते. त्याला रिंग ऑफ फायर असेही म्हणतात.

पृथ्वीपासून चंद्राचे अंतर संपूर्ण सूर्यग्रहण असेल की कंकणाकृती सूर्यग्रहण असेल हे ठरवते. २०२४ सालातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण २ ऑक्टोबर रोजी दिसणार आहे. परंतु हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. हे सूर्यग्रहण दक्षिण अमेरिका आणि पॅसिफिक महासागरात दिसणार आहे.

२६ डिसेंबर २०१९ रोजी भारतात दिसलेले शेवटचे सूर्यग्रहण होते. पुढील सूर्यग्रहण पाहण्यासाठी भारतीयांना बराच काळ वाट पाहावी लागणार आहे. भारतातील पुढील सूर्यग्रहण २१ मे २०३१ रोजी दिसणार असून दक्षिण भारतातील अनेक भागात ते दिसेल.

सूर्यग्रहणाची तारीख   सूर्यग्रहण प्रकार
२ ऑक्टोबर २०२४       कंकणाकृती सूर्यग्रहण
२९ मार्च २०२५           आंशिक सूर्यग्रहण
१७ फेब्रुवारी २०२६      कंकणाकृती सूर्यग्रहण
१२ ऑगस्ट २०२६        संपूर्ण सूर्यग्रहण
६ फेब्रुवारी २२७         कंकणाकृती सूर्यग्रहण
२ ऑगस्ट २०२७         संपूर्ण सूर्यग्रहण
२६ ऑगस्ट २०२८       कंकणाकृती सूर्यग्रहण
२२ जुलै २०२८            संपूर्ण सूर्यग्रहण
१ जून २०३०               कंकणाकृती सूर्यग्रहण
२५ नोव्हेंबर २०३०       संपूर्ण सूर्यग्रहण

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe