एलियन अर्थात परग्रहीय व्यक्ती सोप्या भाषेत सांगायचे झाले तर दुसऱ्या ग्रहावरील व्यक्ती. हा विषय नेहमीच वादात राहिलेला आहे. अनेकांनी एलियन पहिले असा दावा आजवर केलेला आहे. तर अनेकांनी उद्या तबकड्या पाहिल्याचा व त्यासंबंधी फोटो दाखवण्याचाही दावा केला आहे.
परंतु वैज्ञानिकांनी मात्र अद्याप याबाबत काही दुजोरा दिलेला नाही. दरम्यान आता एका अमेरिकी नौदलाच्या निवृत्त अधिकाऱ्याने पाण्याखालील एलियन सापडल्याचा दावा केलाय. विशेष म्हणजे या दाव्यानंतर अमेरिकी सरकारने पाण्याखाली एलियन शोधण्याचा तपास देखील सुरू केलाय.
‘यूएस नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशन’चे (एनओएए) माजी प्रमुख टिमोथी गॅलॉडेट यांनी असा दावा केलाय. विशेष म्हणजे कॅलिफोर्निया किनाऱ्याजवळील सागरी तळामध्ये अमेरिकी नौदलाने सोनार रेकॉर्डिंगचा वापर करून या शोधाचा दावा केला असल्याचे एका वृत्तामध्ये म्हटले आहे.
टिमोथी हे अमेरिकी नौदलाचे निवृत्त रीअर अॅडमिरल असून एक वस्तू डोंगराला आदळल्यानंतर घसरली आणि थांबली याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. गेल्या १८ महिन्यांत त्यांनी खलाशी, पाणबुडी आणि लष्करी जवानांच्या अहवालांचा अभ्यास केला. त्यात समुद्रात एक अनोळखी वस्तू दिसल्याचे सांगण्यात आले. एलियन्सबाबत दावे या आधी देखील झाले आहेत पण पहिल्यांदाच अमेरिकन सरकारने त्याची तातडीने चौकशी करण्याचे मान्य केले आहे.
आधीही अशा काही घटना घडल्याचा दावा
याआधी अमेरिकेच्या बॉर्डर पेट्रोल विमानाच्या थर्मल इमेजिंग सिस्टीमने पोर्तो रिकोजवळ अटलांटिक महासागरात एक वेगवान जहाज घुसल्याचे आढळले होते. जगभरात यूएफओ आणि यूएसओ दिसण्याच्या घटनांमध्ये हा शोध नवीन आहे. यापूर्वी २००४ मध्ये निमित्झ ची घटना आणि १९७६ मध्ये तेहरानमध्ये यूएफओ दिसल्याचा समावेश आहे.
शोधकार्यासाठी पाणबुडी तैनात करणार
टिमोथी हे एलियन रहस्ये उलगडण्यासाठी सखोल संशोधनाच्या महत्त्वावर भर देतात. त्या ठिकाणी रिमोट कंट्रोल पाणबुडी तैनात करण्याची शिफारस त्यांनी केली असून हे नवीन व्हिडिओ फुटेजसह शोधाचे अधिक विश्लेषण करण्यास मदत करेल. समुद्राखालील या अनोख्या वस्तूंना यूएसओ म्हणून ओळखले जाते.