७ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : माणसाची ऐपत त्याच्या चपलांवरन कळते असे म्हटले जाते, तशी ती फाटक्या अंडरवेअरवरूनही कळते. ‘ये बडा आराम का मामला हैं,’ ‘ये तो बडा टॉइंग हैं’, ‘बड़े आराम से’ अशा वेगवेगळ्या टॅगलाइनने वर्णन केल्या जाणाऱ्या या अंडरवेअरचा इतिहास आणि त्याचे अर्थशास्त्र जाणून घेऊया…
अंडरवेअरचा इतिहास तब्बल सात हजार वर्षांपूर्वीचा आहे. समाजशास्त्रज्ञ ‘थिअरी ऑफ कॉन्फॉर्मिटी अॅण्ड डिव्हिअन्स’चा उल्लेख करतात याचा अर्थ असा की, जेव्हा एखादी गोष्ट सहज उपलब्ध होते तेव्हा तिचे महत्त्व कमी होते.
जेव्हा त्याची उपलब्धता कमी होते तेव्हा त्याचे खरे मूल्य कळते. मग ती लक्झरी बनते, अंडरवेअर ही अशीच एक गोष्ट आहे; पण हजारो वर्षांपूर्वी जंगलात आणि गुहांमध्ये राहणाऱ्या आपल्या पूर्वजांना चैनीसाठी वाव नव्हता. त्यांनी एकच मूलभूत तत्त्व पाळले.ते म्हणजे उपयुक्ततेचे. थोडक्यात, सांगायचे तर ते आवश्यक गोष्टींवरच भर देत असे.
अंडरवेअरचा इतिहास
जेव्हा आपल्या पूर्वजांना गुप्तांग झाकले पाहिजे असे वाटायला लागले तेव्हा त्यांनी सुमारे ७४०० वर्षापूर्वी लंगोटी वापरण्यास सुरुवात केली. लंगोटी म्हणजे कंबर आणि पाय यांच्यामध्ये बांधलेला कापडाचा तुकडा. नंतर हळूहळू यातही काही प्रयोग झाले. काही लंगोट बनवले गेले जे मिनी स्कर्टसारखे होते.
त्यातूनच हळूहळू पहिल्या मानवी संस्कृतीची पायाभरणी झाली.इजिप्तच्या बदरिया संस्कृतीत तागाच्या दोराचे लंगोट बनवले जात होते.स्त्रियांसाठी चामड्याचे लंगोट बनवण्यात आले, ज्या त्या मासिक पाळीदरम्यान घालत असत.हा क्रम दोन ते अडीच हजार वर्षे चालू राहिला.त्यानंतर युरोपात रोमन साम्राज्य आले.
रोमन साम्राज्यात घालायचे रेशमाचे लंगोट
रोमन साम्राज्यात व्यापार वाढला.लोकांनी पैसा मिळवला आणि गरीब-श्रीमंत यांच्यातील दरी वाढली. अंतर्वस्त्रांच्या निवडीवरही त्याचा प्रभाव दिसून आला. श्रीमंत लोक रेशमाचे लंगोट घालू लागले. गरीब फक्त तागाच्या दोरापासून तयार केलेल्या अंडरवेअरवरच राहिले. लोकरीचे लंगोट युरोपच्या थंडीत वापरले जात असे. स्त्रिया सबिकुला घालू लागल्या. ते दोन प्रकारचे होते. एक चड्डीसारखे आणि दुसरे काहीसे आधुनिक बिकिनीसारखे. ते दोराच्या साह्याने कंबरेवर बांधले जायचे. रोमन युगात खेळ खेळणारे पुरुष आणि स्त्रिया ते परिधान करत असत.
अंडरवेअरचे स्थिर अर्थशास्त्र
अमेरिकी अर्थशास्त्रज्ञ आणि अमेरिकेच्या सेंट्रल बँकेचे माजी अध्यक्ष अॅलन ग्रीनस्पॅन यांनी एक मजेशीर गोष्ट सांगितली. ते म्हणाले की, वैयक्तिक स्वच्छतेच्या दृष्टीने पुरुषांची अंतर्वस्त्रेदेखील एक आवश्यक वस्तू आहे, ज्याची मागणी बहुतेक वेळा वाढतही नाही किंवा कमीही होत नाही. पण कधी कधी अर्थव्यवस्था अशा टप्प्यावर येते की, अंतर्वस्त्रांसारख्या वस्तूंची मागणीही कमी होऊ लागते. याचा अर्थ असा की लोकांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटले आहे.
फॉर्च्यून नियतकालिकाच्या फेब्रुवारी २०२३ मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार २०२२ मध्ये अमेरिकेत पुरुषांच्या अंडरवेअरच्या किमतीत घसरण सुरू झाली आणि हा तोच काळ आहे जेव्हा कोविडच्या प्रभावामुळे अमेरिकेत अर्थव्यवस्था कोलमडली होती आणि बेरोजगारी वाढली होती.
जाहिरातींचा धुमाकूळ
१९७० आणि १९८० च्या दशकात आकर्षक अंडरवेअरचा ट्रेंड आणखी वाढला. फक्त नर्तक परिधान करायचे ते ‘जी-स्ट्रिंग ‘सारखे अंडरवेअर लोकप्रिय झाले. अंडरवेअरची जाहिरात करताना मॉडेल्सचे अर्धनग्न फोटो, मग ते पुरुष असो वा महिला, दाखवले जाऊ लागले.
अशा प्रकारे केल्विन क्लेन आणि व्हिक्टोरिया सीक्रेटसारखे मोठे बॅण्ड प्रसिद्ध झाले. १९९० च्या दशकात बॉक्सर ब्रीफ्स लोकप्रिय झाले. मूलतः पुरुषांसाठी डिझाइन केलेले हे अंतर्वस्त्र आता महिलांसाठी देखील उपलब्ध आहेत.
औद्योगिक क्रांतीनंतर दुकानातून उपलब्ध
औद्योगिक क्रांती झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर उत्पादनामुळे अंतर्वस्त्रांसह अनेक गोष्टी बदलल्या. पूर्वी लोक स्वतःची अंतर्वस्त्रे बनवत असत; पण आता ते दुकानातून विकत घेऊ लागले. युनियन सूट नावाचे अंडरवेअर पुरुष आणि महिला दोघांतही लोकप्रिय झाले होते. युनियन सूट जंप सूटसारखेच होते. यात खांद्यापासून पायापर्यंत कापड घातले जात असे.
मध्ययुगीन काळात ब्राइसची चलती
मध्ययुगीन काळात ब्राइस नावाचे कापड पुरुषांमध्ये लोकप्रिय झाले. हा एक प्रकारचा सैल पायजमा होता, जो अंतर्वस्त्रासारखा परिधान केला जात असे. त्याची लांबी गुडघ्यापर्यंत होती. यामध्ये पुरुष त्यांचे शर्ट गुंडाळत असत. या पायजम्यांना पुढच्या बाजूला एक झडप होती, जिला कॉडपीस म्हणत.
लघुशंका करताना ते सोयीचे होते. पण १५९० पर्यंत ही फॅशन कमी झाली. यानंतर लेगिंग्जचा ट्रेंड आला; पण त्या आजच्या सारख्या नव्हत्या. युरोपातील श्रीमंत माणसांनी ‘ब्राइस’चे नवे रूप चाऊसेस नावाचे कापड घालायला सुरुवात केली. ते ‘टाइट फिटिंग’ होते आणि दिसायलाही चांगले.
‘जॉकी’ ब्रॅण्डचा उदय
युनियन सूटची प्रथा २० व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत सुरू होती. पण १९३५ मध्ये कूपर्स कंपनीने पहिले ‘वाय फ्रंट ब्रिफ्स’ विकले आणि ते खूप लोकप्रिय झाले. पुढे हाच बैंड ‘जॉकी’ म्हणून ओळखला जाऊ लागला. १९५०च्या दशकात अंडरवेअर डिझाइनमध्ये मोठा बदल झाला.