२४ जानेवारी २०२५ बेतिया : सर्वत्र बोकाळलेली गुन्हेगारी आणि दारूबंदी तसेच महिला अत्याचाराच्या घटनांनी नेहमीच चर्चेत असलेल्या बिहारमध्ये एका शिक्षण अधिकाऱ्याच्या घरात नोटांचे मोठे घबाड आढळले आहे. या अधिकाऱ्याच्या घरात तब्बल दोन बेड भरून ५००, २०० व १०० च्या नोटांच्या गड्या हाती लागल्यामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत.या शिक्षण अधिकाऱ्याने पदाचा गैरवापर व भ्रष्ट मार्गाने संपत्ती जमा केल्याचे सांगण्यात येत आहे.
बिहारच्या बेतिया जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी (डीईओ) रजनीकांत प्रवीण यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर रोकड असल्याची गोपनिय माहिती मिळाल्यानंतर दक्षता अधिकाऱ्यांनी गुरुवारी कारवाईचा बडगा उगारला आहे.यावेळी त्यांच्या घराची झडती घेतली असता तिथे मोठ्या प्रमाणावर रोकड आढळली आहे.सुमारे तीन तास चाललेल्या या बेधडक कारवाईत तब्बल दोन बेड भरून रोकड जप्त करण्यात आली आहे.एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैसा पाहून दक्षता विभागाचे अधिकारीसुद्धा आश्चर्यचकित झाले आहेत.
या नोटा मोजण्यासाठी एक मशीनही मागवण्यात आली आहे.परंतु, रजनीकांत यांच्या घरात एकूण किती रक्कम आढळली आहे ? याचा खुलासा होऊ शकलेला नाही.आपल्या मर्जीतील कंत्राटदारांना कामे देऊन त्या बदल्यात मोठ्या प्रमाणावर लाच स्वीकारल्याचा रजनीकांत प्रवीण यांच्यावर आरोप आहे.अनेक शिक्षकांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.
सध्या रजनीकांत घरीच असून ते चौकशीचा सामना करीत आहेत. त्यांच्यावर झालेल्या सर्व आरोपांचा तपास दक्षता पथक करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याशिवाय उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती गोळा केल्याचा आरोपसुद्धा त्यांच्यावर आहे.यासंबंधी बेतिया, समस्तीपूर व दरभंगास्थित त्यांच्या ठिकाणी छापे टाकले जात आहेत.पदाचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणावर अवैध मार्गाने पैसा कमावल्याचा त्यांच्यावर आरोप होत आहे.
रजनीकांत गेल्या तीन वर्षांपासून बेतिया जिल्ह्यात शिक्षण अधिकारी म्हणून सेवारत आहेत. २००५ पासून ते या विभागात सेवा देत आहेत. दरभंगा, समस्तीपूरसह इतर अनेक जिल्ह्यांत शिक्षण अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.त्यामुळे त्यांच्यावर झालेले आरोप गंभीर मानले जात आहेत.
दरम्यान, बिहारमधील शिक्षण विभागातील अनियमितता चव्हाट्यावर आल्याने सर्वच अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी वाढली आहे.बिहारमध्ये बेंच खरेदीत घोटाळा झाल्याचे समोर आले आहे.यापूर्वी किशनगंज व पूर्वचंपारण जिल्ह्यातील शिक्षण अधिकाऱ्यांविरोधात वित्तीय अनियमिततेप्रकरणी कारवाई झाली आहे.