अहमदनगर जिल्हा बँकेत मनमानी कारभार ! स्वतःच्या हव्यासापोटी १ कोटी रूपयांच्या वाहनांची खरेदी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर जिल्हा बँकेमध्ये झालेल्या मनमानी कारभाराची ईडीद्वारे चौकशी झाल्यास भ्रष्टाचाराचे अनेक पुरावे बाहेर पडतील. बँकेचे अध्यक्ष मनमानी कारभार करीत आहेत. स्वतःच्या हव्यासापोटी १ कोटी रूपयांच्या दोन वाहनांची खरेदी करण्यात आली असून अनेक कारखान्यांना बोगस कर्ज वाटप करण्यात आले,

याद्वारे सहकारात आशिया खंडात अग्रगण्य असलेल्या नगर जिल्हा बँकेला डबघाईत लोटण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांचे नाव न घेता केली.

राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथील एका कार्यक्रमात आमदार तनपुरे बोलत होते. अध्यक्षस्थानी विठ्ठल मोकाटे गुरूजी होते. आ. तनपुरे यांनी राज्य शासनाच्या कारभारावर सडकून टिका साधली.

गतीमान शासनाने सर्वसामान्यांच्या प्रश्नांना पायदळी घेतले. अनेक विकास कामांना स्थगिती दिली. काही अधिकारी टक्केवारीसाठी कामे अडवित असल्याचे समजले आहे. संबंधितांना आमच्या सत्ता काळात योग्य ती जागा दाखवू.

ब्राम्हणी गावालाकोट्यवधी रूपयांचा निधी दिल्याचे समाधान आहे. २ हजार कोटीच्या एसीएफ योजनेबाबत मंत्रालयात प्रश्न उपस्थित केला. परंतु त्याबाबतही सध्याचे उपमुख्यमंत्री तथा उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उडवाउडवीचे उत्तर देऊन सर्वसामान्यांच्या प्रश्नाबाबत आपणास घेणेदेणे नसल्याचे दाखवून दिले;

परंतु एसीएफमध्ये असलेल्या २ हजार कोटी रकमेबाबत पाठपुरावा करीत ग्रामिण भागातील उर्जा प्रश्न सोडविण्याचा आपला मानस असल्याचे आ. तनपुरे यांनी सांगितले. जिल्हा बँकेचा कारभार हाती घेतलेले नव्या अध्यक्षांनी पद मिळताच कोणतीही गरज नसताना १ कोटी रूपये खर्च करून दोन वाहने खरेदी केले.

जिल्हा बँकेत पद घेतल्यापासून अध्यक्ष जिल्हा बँक मालकीची झाल्याप्रमाणे वागत असल्याचे अनेक जिल्हा बँकेचे संचालक भेटून सांगतात. काही कारखान्यांना बोगस कर्ज वाटप करून बँकेचे नुकसान केले जात आहे. त्याची चौकशी झाल्यास खरे काय ते समोर येईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe