तुम्हाला घर बांधायचे असेल तर ते शहरात बांधा किंवा ग्रामीण भागात बांधा परंतु यासाठी लागणारा खर्च हा खूप मोठ्या प्रमाणावर लागतो. कारण घर बांधण्यासाठी लागणारे आवश्यक साहित्याचे जर आपण दर पाहिले तर ते प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे साहजिकच घर बांधण्याच्या खर्चात देखील मोठ्या प्रमाणावर वाढ होते.
त्यामुळे प्रत्येकच नागरिकाला स्वतःचे घर बांधता येईल हे आर्थिक दृष्ट्या परवडणारे नसते. यामध्ये जर तुमची स्वतःची जागा असेल तर चांगले परंतु जर जागा विकत घेऊन जर तुम्हाला स्वतःचे घर बांधायचे असेल तर मात्र प्रचंड प्रमाणात पैसा यामध्ये टाकावा लागतो.
जर आपण यामध्ये काटकसर करण्याचा विचार केला तर याचाच सरळ विपरीत परिणाम हा घर बांधणीच्या गुणवत्तेवर होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे गुणवत्तेशी कुठल्याही प्रकारची तडजोड न करता कमीत कमी खर्चामध्ये घर कसे बांधता येईल हा देखील प्रश्न बऱ्याच जणांच्या मनात येतो. त्यामुळे या लेखात आपण याबाबतीत महत्त्वाची माहिती घेणार असून काही छोट्या परंतु महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींकडे जर लक्ष दिले तर नक्कीच कमीत कमी खर्चामध्ये आपली स्वप्नातली वास्तू उभी राहू शकते.
घर बांधताना या बाबींची घ्या काळजी
1- घराचे बांधकाम करा परंतु नकाशा प्रमाणेच– तुम्हाला देखील घर बांधणे सुरू करायचे असेल तर बांधकाम कारागिरावर विश्वास ठेवून घराचे बांधकाम सुरू करू नका. याकरिता सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही तुमच्या घराचा प्लॅन तयार करा व या प्लॅननुसारच बांधकाम करायला सुरुवात करा. असे केल्यामुळे तुमच्या घराचा लागणारा खर्च हा खूप मोठ्या प्रमाणावर कमी होण्यास मदत होईल व नंतर काही गोष्टींमध्ये बदल करण्याची देखील गरज पडणार नाही.
2- घर बांधण्यासाठी चांगल्या कारागिराची निवड– घर बांधायचे असेल तर बांधकाम देण्यापूर्वी संबंधित कारागीर हा त्या क्षेत्रात तरबेज आहे का याची खात्री करा व नंतरच त्याला घर बांधण्याचे कंत्राट द्या. कारण या क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेले व्यक्ती तुम्हाला घर बांधण्यातला खर्च कमी करण्यास मोठ्या प्रमाणावर मदत करू शकतो. कमीत कमी जर आपण विचार केला तर एक कुशल बांधकाम व्यावसायिक तुम्हाला तुमच्या घराची किंमत दहा टक्क्यांपर्यंत कमी करण्यास मदत करू शकतो.
3- बांधकाम करण्याकरिता फ्लाय एश विटा किंवा ब्लॉक विटांचा वापर– आपण ज्या काही मातीच्या विटा घर बांधण्याकरता वापरतो त्यांच्या देखील किमतींमध्ये आता मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. त्यामुळे तुम्ही या विटांना पर्याय म्हणून ब्लॉक विटा किंवा फ्लाय ऐश विटांचा वापर करणे महत्त्वाचे ठरेल.
जर तुम्ही या विटांची किंमत पाहिली तर प्रतिवीट सात ते दहा रुपयांप्रमाणे मिळते. परंतु तुम्ही मातीच्या विटांचा वापर केला तर ती दहा ते बारा रुपये प्रति वीट असा तिचा खर्च आहे. त्यामुळे या विटांऐवजी ब्लॉक किंवा फ्लाय एश विटांचा वापर फायद्याचा ठरतो. तसेच ब्लॉकपासून बनवलेल्या भिंतीला प्लास्टर करण्याची देखील आवश्यकता भासत नाही व त्यामुळे इतर मटेरियल व मजुरीचा खर्च देखील वाचतो. त्यामुळे या पद्धतीने देखील तुम्हाला खर्च बऱ्याच प्रमाणात कमी करता येतो.
4- एकदा प्लॅन तयार केल्यानंतर त्यात कुठलाही बदल करू नका– तुम्ही तुमच्या घराचा संपूर्ण प्लॅन तयार केल्यानंतर त्यानुसारच घराचे बांधकाम करा. घराचे काम पूर्ण होईपर्यंत त्या प्लॅनमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करू नये. ही बाब देखील तुमचा घर बांधकामाचा खर्च आणि लागणारी मजुरी यावरील खर्च कमी करण्यास मदत करू शकतो.
5- बांधकाम साहित्य वाया घालवणे टाळा– बऱ्याचदा बांधकाम सुरू असताना वाळू तसेच सिमेंट व विटांचामोठ्या प्रमाणावर नुकसान होते. या बाबीमुळे बांधकाम खर्चात दहा ते पंधरा टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. यामुळे महत्त्वाच्या असलेल्या या गोष्टींचा अपव्यय होणार नाही याकडे लक्ष द्या. जेणेकरून तुमचा खर्च कमी होईल.
6- बांधकाम साहित्य खरेदी करताना घ्या काळजी– बांधकामा करिता लागणारे साहित्य तुम्हाला खरेदी करायचे असेल तर त्याकरिता तुम्ही अभ्यास करणे गरजेचे आहे. करिता तुम्ही तुमच्या आजूबाजूचे जे काही बांधकाम साहित्य विक्रीचे मोठे दुकाने असतील या ठिकाणी जाऊन तुम्ही बांधकाम साहित्याचा दर काढू शकतात किंवा ऑनलाईन पद्धतीने देखील तुम्हाला याबद्दलची माहिती मिळू शकते. त्यानंतर तुम्ही यातील मधला मार्ग काढून बांधकाम साहित्य खरेदी करण्याचा निर्णय घ्यावा. त्यामुळे तुमच्या बांधकाम खर्चात मोठी बचत होऊ शकते.