Success Story :- समाजामध्ये असे अनेक उच्चशिक्षित तरुण आहेत की त्यांनी घेतलेल्या शिक्षणाला अनुरूप व्यवसाय किंवा नोकरी न करता वेगळ्याच धाटणीतील व्यवसायाला सुरुवात करतात आणि अभ्यासपूर्ण रीतीने त्या व्यवसायाची नियोजन करून प्रचंड प्रमाणात यश मिळवतात. या यशामागे त्यांचे असलेले कष्ट, मनातील जिद्द आणि जी गोष्ट ठरवलेली आहे ती पूर्ण करण्यासाठी योग्य दिशेने केलेले प्रयत्न यांना खूप महत्त्व असते.
याप्रमाणे आपल्याला समाजामध्ये अनेक व्यक्ती दिसून येतात. याच अनुषंगाने जर आपण कोल्हापूर जिल्ह्यात असलेल्या शिवारे या गावचे दीपक पाटील यांचे उदाहरण पाहिले तर अगदी या मुद्द्याला साजेशे असेच आहे. विदेशातील इंजीनियरिंग फिल्डमधील नोकरीला रामराम ठोकून चक्क त्यांनी शेळीपालन व्यवसाय सुरू केला व अभ्यासपूर्ण रीतीने त्याचे नियोजन करून तो यशस्वी देखील केला. त्यांचीच यशोगाथा आपण या लेखात बघणार आहोत.
इंजिनिअरिंग क्षेत्रातील नोकरी सोडली आणि शेळी पालन व्यवसायात मिळवले यश
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, कोल्हापूर जिल्ह्यातील शिवारे या गावचे दीपक पाटील यांनी डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंशनमध्ये शिक्षण घेतलेले असून तब्बल तेरा वर्षे त्यांनी ब्रूनेई दारूसलाम या ठिकाणी नोकरी केली. हे गाव इंडोनेशिया आणि मलेशिया या देशांच्या बॉर्डरवर आहे. विशेष म्हणजे ही चांगल्या पगाराची नोकरी होती व त्या माध्यमातून त्यांना चांगला पैसा देखील प्राप्त होत होता. परंतु गावी येऊन शेतीमध्ये करिअर करायचे हा उद्देश डोक्यामध्ये असल्यामुळे ते गेले चार वर्षांपूर्वी गावी परतले. त्यांच्या स्वतःची घरची दीड एकर शेती होती. या शेतीला जोड म्हणून त्यांनी डोंगराळ व उताराची तेरा एकर जमीन विकत घेतली.
या जमिनीला पिके घेण्याला लायक करण्यासाठी याला पर्यायी उत्पन्न स्त्रोत निर्माण व्हावे याकरिता शेळीपालन आणि पोल्ट्री व्यवसाय करायचा ठरवला. या क्षेत्रातला अनुभव शून्य असताना देखील त्यांनी प्रशिक्षण घेण्याचे ठरवले व अभ्यास पूर्ण रीतीने तळसंदे येथील कृषी विज्ञान केंद्रातून शेळीपालनाचे प्रशिक्षण घेतले.
याकरिता त्यांनी तब्बल राज्यातील 139 शेळी फार्मला भेटी दिल्या. या दरम्यान त्यांनी या व्यवसायातील बारकावे तसेच शेळ्यांचे संगोपन करण्याच्या पद्धती व वितरण, व्यवसायातील आर्थिक गणित सगळे शिकून घेतले व याचा परिपूर्ण अभ्यास करून या क्षेत्रातील काही तज्ञांच्या मार्गदर्शन घेऊन शेळी पालन व्यवसायाला सुरुवात केली.
आज अशा पद्धतीच्या आहे त्यांचा शेळीपालन व्यवसाय
या सगळ्या पद्धतीतून जात त्यांनी अर्धबंदिस्त, उंचावरील पद्धतीचे 2250 चौरस फूट आकाराचे शेड बांधले व या शेडमध्ये सगळ्या प्रकारच्या आधुनिक सोयी सुविधा उभ्या केल्या. दहा शेळ्यांपासून त्यांनी या व्यवसायाला सुरुवात केली व त्यांच्याकडे आता उस्मानाबादी,आफ्रिकन बोअर आणि बीटल्स हे या जातीच्या शेळ्या आहेत. यामध्ये त्यांनी पाण्याची व्यवस्थितपणे स्वतंत्र्य सोय केली असून शेडमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे तसेच 25 गुंठे शेजारी मोकळी जागा सोडलेली आहे.
तसेच आजूबाजूला संपूर्णपणे जाळीची व्यवस्था केली असून वन्य प्राण्यांपासून शेळ्यांचे संरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा प्रयत्न केला आहे. तसेच प्रत्येक शेळीला टॅगिंग देखील केले आहे व त्यानुसारच कोणत्या शेळेला कोणते औषध द्यायचे आहे किंवा कोणती शेळी गाभण आहे त्याची सगळी माहिती कॉम्प्युटर सिस्टमद्वारे अपडेट केली जाते व ती रजिस्ट्रेशन देखील केले जाते. त्यांनी घेतलेल्या प्रशिक्षणातून शेळ्यांची पैदासी पासून ते आरोग्यविषयक सर्व बारीक-सारीक तपशील समजून घेतला आहे.
अशा पद्धतीने केले आहे चाऱ्याचे व्यवस्थापन
जेव्हा त्यांनी शेळीपालनाला सुरुवात केली तेव्हा विकतचा चारा आणला. परंतु चाऱ्यावर खूप जास्त खर्च होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले व त्यांनी इतर शेळी पालकांकडून मार्गदर्शन घेत चार एकरमध्ये सुपर नेपियर, साडेतीन एकरामध्ये तुती, 35 गुंठे क्षेत्रांमध्ये मेथी घास, 30 गुंठे क्षेत्रांमध्ये दशरथ घास व शेवरी अशा प्रकारच्या चारा पिकांची लागवड केली. या चारा पिकाचे नियोजन करताना ते साठ टक्के नेपियर व वीस टक्के तुती,
दहा टक्के दशरथ घास आणि मेथी घास आणि इतर शेवटी तसेच सुबाभूळ आदींचे मिश्रण करून सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान शेळीला तिच्या वजनानुसार दीड किलो सुखा चारा यामध्ये प्रामुख्याने तुरीचे भुस्कट तसेच भुईमुगाचा पाला इत्यादी दिला जातो व मक्का, सोयाबीन तसेच सरकी पेंड व मीठ, मिनरल मिक्स्चर इत्यादींचा खुराक देखील दिला जातो. सकाळी नऊला चाऱ्याची व्यवस्थापन केल्यानंतर संध्याकाळी चार वाजेच्या दरम्यान सकाळचे खाद्य पुन्हा दिले जाते. खाद्यावरील खर्च कमी करावा याकरिता त्यांचा हातात फीडबिल उभारण्याचा प्रयत्न आहे.
अशा पद्धतीने करतात विक्री व्यवस्थापन
जर आपण शेळीपालनाचे विक्री व्यवस्थापन पाहिले तर याआधी गावरान कोंबडी पालन त्यांनी सुरू केले होते व यामध्ये दोन हजार ते पाच हजार पक्षांचे बॅच त्यांनी घेतली होती. या व्यवसायाच्या वेळेस जेव्हा ते अंडी विक्रीची जाहिरात करत होते तेव्हा बाजारपेठेपेक्षा कमी किमतीत त्यांनी कोंबड्यांची विक्री केल्याने त्यांचा ग्राहक वर्ग खूप मोठा होता व याच दिवसातून जोडलेले ग्राहक शेळ्यांच्या शेतीसाठी खूप फायद्याचे ठरले.
आता देखील त्यांनी बाजारपेठेपेक्षा दर खूप कमी ठेवल्यामुळे ग्राहकांकडून खूप मोठी मागणी असते. या व्यवसायाच्या माध्यमातून ते वर्षाला सात लाख रुपयांची उलाढाल करत असून तेरा ट्रॉली लेंडीखत देखील त्यांना मिळते. या व्यवसायामध्ये ते थोडे थोडे भांडवलाची गुंतवणूक करत असून हळूहळू प्रगती करण्यावर त्यांचा प्रचंड विश्वास आहे. या व्यवसायामध्ये त्यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्य व नातेवाईक त्यांचे देखील खूप मोठी मदत होत आहे.