Health News : दीड-दोन वर्षे अवघ्या जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोना महामारीची तीव्रता जरी ओसरली असली तरी अजूनही या साथीच्या रोगाचे समूळ उच्चाटन करता आलेले नाही. अमेरिका, चीन यांसारख्या देशांमध्ये आजही कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे कोरोनाची दहशत आजही कायम आहे.
अशा परिस्थितीत बँकॉकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका अवघ्या ६ महिन्यांच्या चिमुरड्याला कोरोनाची लागण झाली होती. त्याच्यावर उपचार केल्यानंतर या बाळाच्या डोळ्याचा रंगच बदलून गेला. डॉक्टर याला मेडिकल साईड इफेक्ट असे म्हणत आहेत.
एका ६ महिन्यांच्या बाळाला सतत काही दिवस ताप आणि खोकला होता. त्यानंतर त्याच्या काही तपासण्या करण्यात आल्या, त्यातून बाळाला कोरोनाची लागण झाल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. डॉक्टरांनी बाळाला तीन दिवसांसाठी औषध दिले.
त्यानंतर बाळाच्या प्रकृतीत सुधारणा होऊन कोरोनाची लक्षणेही कमी झाल्याचे दिसून आले. पण त्यानंतर दोन दिवसांत बाळाच्या आईच्या लक्षात आले की, त्याच्या डोळ्यांचा रंग बदलला आहे. बाळाच्या डोळ्यांचा रंग राखाडी होता आणि उपचारानंतर बाळाचे डोळे निळे दिसू लागले.
हे आईने तत्काळ डॉक्टरांच्या निदर्शनास आणून दिले. डॉक्टरांनी तत्काळ बाळावरील उपचार थांबवले आणि त्याला दिले जाणारे फेविपिरावीर हे औषध पाच दिवसांसाठी थांबवण्यात आले. त्यानंतर मात्र बाळाच्या डोळ्यांचा मूळ रंग पुन्हा दिसू लागला.