मूळव्याध आणि फिशरमुळे उद्भवतो कॅन्सरचा धोका ?

Sushant Kulkarni
Published:

१३ फेब्रुवारी २०२५ मुंबई : गुदद्वाराजवळील रक्तवाहिन्यांमधील दाब वाढला की, मूळव्याधीचा त्रास होतो.मूळव्याधाची समस्या ही दीर्घकालीन बद्धकोष्ठता,बैठे काम,गर्भधारणा,लठ्ठपणा किंवा शौचाला कायम जोर करण्यामुळे आणि कुंथण्यामुळे आतड्यांवर येणाऱ्या ताणामुळे आढळून येते.मूळव्याध हा गुदाशयाच्या आतील किंवा बाह्य भागाभोवती असू शकतो.

मूळव्याध किंवा फिशरमुळे कर्करोग होतो का ? यावर अधिक प्रकाश टाकला आहे तो जनरल सर्जन डॉ.लकिन वीरा यांनी.मूळव्याध झाल्यास गुदद्वार जवळ खाज सुटणे आणि रक्तस्राव होणे, मलातून रक्त येणे, गुदद्वाराजवळ गुठळ्या होणे आणि आतड्यांसंबंधी हालचाली दरम्यान वेदना होणे ही लक्षणे जाणवतात.

काही प्रकरणांमध्ये, गुदद्वाराजवळील रक्तवाहिन्या सुजल्यावर त्यांचा दाह होतो,त्यांच्यावर अतिरिक्त दाब पडल्यावर जळजळ सुरू होते.दीर्घकाळापर्यंत बद्धकोष्ठतेमुळे होणारा रोग म्हणजे फिशर,मूळव्याधाप्रमाणेच फिशर हा देखील अतिशय वेदनादायक आजार आहे.

या आजारात गुदद्वाराची जागा फाटते आणि मलत्याग करताना त्या व्यक्तीला अतिशय वेदना होतात.पोट साफ होताना कडक शौचास झाल्याने गुदद्वाराच्या नाजूक उतकांमध्ये क्रॅक येऊ शकतात. दीर्घकालीन बद्धकोष्ठता किंवा अतिसारामुळे फिशर विकसित होऊ शकतात.

मूळव्याध आणि फिशरमुळे कर्करोग होऊ शकतो का ?

खरंतर मूळव्याध आणि फिशरमुळे कर्करोग होत नाही.लोकांनी कोणत्याही गैरसमजुतींवर विश्वास ठेवू नये आणि त्याऐवजी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आपल्या शंका दूर कराव्यात. लोक सहसा घाबरतात किंवा चिंतेत पडतात, कारण गुदाशयातून रक्तस्राव आणि वेदना यासारख्या या स्थितीची लक्षणे कधीकधी कोलोरेक्टल किंवा गुदद्वाराच्या कर्करोगासारखीच असतात.

जर तुम्हाला मूळव्याध आणि फिशरची समस्या असेल, तर याचा अर्थ असा नाही की, तुम्हाला कर्करोग होईल. याकरिता तज्ज्ञांचा सल्ला घेऊन अचूक निदान आणि वेळीच उपचार सुरू करा.लक्षणे कायम राहिल्यास किंवा तीव्र झाल्यास योग्य निदानासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

मूळव्याध आणि फिशरचे व्यवस्थापन आणि प्रतिबंध

आहारात फायबरचे सेवन वाढवणे,शरीर हायड्रेटेड राखणे आणि जास्त वेळ बसणे टाळा, प्रक्रिया केलेल्या अन्नाचे सेवन टाळा,आहारातील बदलांसह या परिस्थिती व्यवस्थापित केल्या जाऊ शकतात.शिवाय अस्वस्थता आणि वेदना दूर करण्यासाठी सिट्झ बाथ घ्या (गुदद्वाराचे क्षेत्र कोमट पाण्यात भिजवल्याने आराम मिळतो आणि बरे होण्यास चालना मिळते).

वैद्यकीय सल्ल्याने उपचार आणि वेदनाशामक औषधांचे सेवन करा. गंभीर प्रकरणांमध्ये, या परिस्थितींसाठी शस्त्रक्रियेची आवश्यकता भासू शकते. या समस्येस प्रतिबंध करण्यासाठी फायबरयुक्त आहाराचे सेवन करणे, भरपूर पाणी पिणे, नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. मूळव्याध किंवा फिशर तसेच कर्करोगाच्या बाबतीत प्रत्येकाने वेळीच लक्ष दिले पाहिजे आणि अशा समस्यांकडे दुर्लक्ष न करता त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe