४ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : वाढती व्यसनाधीनता तरुणाईच्या मुळावर उठली आहे.भारतात गुटखा व तंबाखु जन्य पदार्थांमुळे तरुण पिढीचे भवितव्य धोक्यात आले आहे.अशीच परिस्थिती राहिल्यास आगामी काळात तंबाखू जन्य पदार्थ सेवन करणाऱ्या सुमारे ५० टक्के लोकांना कॅन्सर, हृदयविकार किंवा श्वसनासारख्या गंभीर आजारांना सामोरे जाण्याची भिती कॅन्सरतज्ञ डॉ. सतिश सोनवणे यांनी व्यक्त केली.
जागतिक स्तरावर ४ फेब्रुवारी रोजी कर्करोग दिन साजरा केला जातो.कर्करोग दीनाच्या पूर्वसंध्येला अहिल्यानगर येथे आयोजित छोटेखानी कार्यक्रमात डॉ. सोनवणे बोलत होते.ते पुढे म्हणाले की, भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेच्या अहवालातही याबाबत चिंता व्यक्त केली आहे.
सध्या तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्या तरुणांवर ज्यावेळी कौटुंबिक जबाबदारी पडेल किंवा त्यांना कर्तबगारी दाखविण्याचे दिवस येतील,त्यावेळी २५ टक्के लोकांना या आजारांशी सामना करावा लागू शकतो.भारतात तंबाखूजन्य पदार्थांमुळे कॅन्सर रुग्णांची संख्या वाढत आहे.वैज्ञानिक प्रगती व नवनवीन उपचार पध्दतींमुळे कॅन्सर असाध्य राहिलेला नाही, असे त्यांनी नमूद केले.
ते पुढे म्हणाले की, शरीरीच्या कोणत्याही भागात विशेषतः मान, स्तनांमध्ये अचानक आलेली गाठ, हळू हळू वाढणारी तसेच बरी न होणारी जखम, औषधालाही दाद न देणारा खोकला किंवा आवाजात पडलेला फरक, वारंवार अपचन, गिळण्याचा त्रास किंवा अन्न उलटून पडणे, शरीरावरील तीळ किंवा मस यात अचानक झालेली वाढ, लघवी, शौचाच्या सवयीतील बदल, खोकल्यातून, उलटीतून, लघवीतून, शौचातून अवेळी किंवा अचानक रक्तस्त्राव होणे यासारखी लक्षणे दिसतात. तंबाखू सेवन करणाऱ्यांनी तोंडाची तपासणी करणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.