7 Heat Stroke Symptoms | एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच देशात तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिल्ली, राजस्थान, गुजरातसह महाराष्ट्र यांसारख्या राज्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे.
या पार्श्वभूमीवर प्रत्येक व्यक्तीने स्वतःची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. उष्माघात टाळण्यासाठी योग्य खबरदारी घेणे आणि गरज असल्यास तात्काळ वैद्यकीय मदत घेणे महत्त्वाचे आहे.

उष्माघात ही एक गंभीर वैद्यकीय स्थिती असते. या वेळी शरीराचे तापमान अचानक 40 अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक वाढते. घाम येणे थांबते आणि शरीर स्वतःला थंड ठेवण्यात असमर्थ ठरते. त्यामुळे उष्माघाताचे सुरुवातीचे लक्षण ओळखणे आणि तात्काळ डॉक्टरकडे जाणे आवश्यक आहे.
‘ही’ लक्षणे दुर्लक्षित करू नका-
डोकेदुखी, चक्कर येणे, डिहायड्रेशन यामुळे माणूस बेशुद्ध होण्याची शक्यता असते. त्वचा कोरडी, गरम आणि लालसर दिसू लागते. या व्यतिरिक्त मळमळ, उलट्या, स्नायू पेटके, वेगाने धडकणारा हृदयाचा ठोका आणि गोंधळल्यासारखी स्थिती निर्माण होणे ही लक्षणंही दिसू शकतात.
काय उपाय कराल?
अशा वेळी काय करावे?, तर दिवसात किमान 8-10 ग्लास पाणी प्यावे. नारळपाणी, लिंबूपाणी, ताक, ओआरएस यांचा समावेश करावा. उन्हात बाहेर जाण्याचे टाळावे, विशेषतः दुपारी 12 ते 3 या वेळेत. बाहेर पडताना टोपी, छत्री, सनग्लासेस वापरणे उपयुक्त ठरते. सुती आणि हलक्या रंगाचे कपडे परिधान करावेत. एसी, पंखा, कूलर यांचा वापर करून शरीर थंड ठेवावे.
अन्नामध्ये फळे, दही, हिरव्या भाज्या यांचा समावेश करा आणि तेलकट व मसालेदार पदार्थ टाळा. नियमित व्यायाम सकाळी किंवा संध्याकाळीच करा.