Health News : डेंग्यु व त्यासारखे रोग रोखण्यासाठी शासनाकडून गेल्या काही वर्षांपासून कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे; परंतु श्रीरामपूर शहरात मात्र पालिका प्रशासनाला याचा विसर पडल्याचे दिसत आहे. याकडे नेत्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
डेंग्यु हा डास चावल्यामुळे होत असला तरी या रोगाला कारणीभूत असलेला डास घाणीत नाही तर स्वच्छ पाण्यात आढळतो. हे लक्षात घेऊन अनेक वर्षांपासून कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन शासन करत असते.
स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत याबाबत प्रत्यक्ष काम केले जाते. नगरपालिका, ग्रामपंचायतींकडून आठवड्ड्यातील एक दिवस कोरडा पाळण्याचे आवाहन नागरिकांना केले जाते. या दिवशी नागरिकांनी पाण्याच्या टाक्या कोरड्ड्या कराव्यात अशी अपेक्षा असते.
मात्र श्रीरामपूर नगरपालिकेला मात्र या कोरड्ड्या दिवसाचा विसर पडल्याचे दिसत आहे. नगरपालिकेकडून अनेक दिवसांपासून कोरडा दिवस पाळण्यात आलेला नाही, ना तसे आवाहन नागरिकांना करण्यात आले.
त्यामुळे साहजिकच नागरिकांकडूनही याकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी डेंग्युच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
सध्या श्रीरामपूर नगरपालिकेचा कारभार प्रशासक बघत आहे. त्यामुळे दैनंदिन कामकाजाबरोबरच अशा अनेक महत्वाच्या उपक्रमांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे याकडे शहरातील नेत्यांनी लक्ष घालून स्वच्छता मोहीम चालवावी, अशी मागणी नागरीक करीत आहेत.